तंत्रज्ञान उभारणीस जोर : 80 पेटंटची प्रक्रिया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये 5-जी अजून आलेले नाही, परंतु अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी मात्र याची तयारी जोरदार केली आहे. चिनी कंपनी ओप्पोच्या एका अधिकाऱयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी भारतामध्ये 80 पेटंट दाखल करण्याची प्रक्रिया करण्याच्या तयारीत आहे. सदरच्या मार्गाचा वापर करुन ओप्पो चालू वर्षात आपली 5-जी सेवेच्या उपकरणांवर पूर्ण लक्ष्य केंद्रीत करण्याचे संकेत आहेत, अशी माहिती ओप्पोचे उपाध्यक्ष आणि संशोधक प्रमुख तस्लीम आरिफ यांनी दिली आहे.
देशामध्ये 5-जी नेटवर्कसाठी लॅबची स्थापना करण्यात येणार असून यासाठी कंपनीच्या मुख्यालय आणि स्मार्ट डिव्हाईस फर्मच्या अन्य केंद्रांवरील अवलंबत्व कमी होणार असल्याचे संकेत आहेत. भारतात 5 जी सेवा उपलब्ध करण्यासाठी कंपनीचा संशोधन व विकास विभाग मदतीला येणार आहे.
आयओटी-5जीवर लक्ष केंद्रीत
आरिफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये प्रामुख्याने आम्ही आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) आणि 5जी सेवा यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करणार आहोत. यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वापरले जाणार आहे. यासोबतच आर्टिफिशयल इंटेलिजेंसवरील सुविधेचा वापर केला जाणार आहे.









