ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०२१ भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली असुन या यादीनुसार देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत ५८ ब्जाधिशांची वाढ झाली असुन गौतम अदानी आणि कुटुंबाने २०२१ मध्ये सर्वाधिक दररोज १,००२ कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे ते ५.०५ लाख कोटी रुपये संपत्ती असणारे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहेत. त्याचबरोबर , रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी २०२० मध्ये दररोज १६३ कोटी रुपये कमावले असून त्यांची एकूण संपत्ती ७.१८ लाख कोटी रुपये आहे.
यावर्षी भारताच्या सर्वाधिक १० श्रीमंत लोकांमध्ये चार नवीन चेहरे आहेत. असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अहवालात म्हटले आहे की, ११९ शहरांमधील १००७ व्यक्तींकडे IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ मध्ये १००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. नवीन अब्जाधिशांची संख्या ही केमिकल आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जास्त आहे. तर, फार्मा अजूनही पहिल्या क्रमांकावर असून एकूण अब्जाधिशांपैकी १३० जण फार्मा क्षेत्रातील आहेत, असे आयआयएफएल वेल्थचे संस्थापक सीईओ करण भगत यांनी स्पष्ट केले आहे.
या यादीवर भाष्य करताना हुरुन इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी अब्जाधीशांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये वेगाने वाढ होत आहे. असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली असली तरी देशाच्या एकुण संपत्ती विभाजन हे विषमतेकडे सरकत असल्याचे गेल्या काही वर्षातील आकडेवारीचा मागोवा घेतल्यास स्पष्ट होते. यामुळे मुख्यत: देशातील सामान्य वर्गाकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा देशातील मुठभर अब्जाधिशांकडे असणारी संपत्ती यामध्ये खुप तफावत असल्याने या यादीत अब्जाधीशांची संख्या वाढत जाणारी असली तरी ही वाढ देशातील सामान्यांच्या चिंतेत भर घालणारीच ठरणार आहे. दिल्लीस्थित शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हे शासन अदानी, अंबानींची भर करणारी धोरण राबवत असल्याचा आरोप यापुर्वीच केला आहे. या अहवालाने ही हाच मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आता वाढली आहे.
Hurun India Rich List 2021: 10 सर्वात श्रीमंत भारतीय
- मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज): ₹ 7,18,000 कोटी निव्वळ मुल्य
- गौतम अदानी (अदानी ग्रुप): ₹ 5,05,900 कोटी निव्वळ संपत्ती
- शिव नादर (HCL): ₹ 2,36,600 कोटी निव्वळ मूल्य
- एसपी हिंदुजा (हिंदुजा ग्रुप): ₹ 2,20,000 कोटी निव्वळ मूल्य
- लक्ष्मी मित्तल (आर्सेलर मित्तल): ₹ 1,74,400 कोटी निव्वळ मूल्य
- सायरस पूनावाला (सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया): ₹ 1,63,700 कोटी निव्वळ मुल्य
- राधाकिशन दमानी (एव्हेन्यू सुपरमार्केट): ₹ 1,54,300 कोटी निव्वळ मूल्य
- विनोद शांतीलाल अदानी (अदानी ग्रुप): ₹ 1,31,600 कोटी निव्वळ मुल्य
- कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला): ₹ 1,22,200 कोटी निव्वळ मुल्य
- जय चौधरी (Zscaler): ₹ 1,21,600 कोटी निव्वळ मूल्य