पुढील 30 दिवस महत्त्वाचे : पावले न उचलल्यास तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची भीती
भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या दुसऱया टप्प्यात आहे. हा संसर्ग रोखण्यात न आल्यास 30 दिवसांत विषाणूचा फैलाव तिसऱया टप्प्यात पोहोचेल. विषाणू संसर्गाला तिसऱया टप्प्यात पोहोचण्यापासून रोखण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे. योग्य पावले उचलण्यात आल्यास याप्रकरणी यश मिळू शकते आणि सरकार याच दिशेने पावले उचलत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळताच सबंधित क्षेत्रातील तयारी स्थानिक स्थितीनुरुप करण्यात आल्याचे प्रतिपादन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक जनरल बलराम भार्गव यांनी केले आहे. तिसऱया टप्प्यात विषाणू लोकांमध्ये फैलावू लागतो. तर चौथ्या टप्प्यात हा विषाणू स्थानिक महामारीचे स्वरुप धारण करतो. हा संसर्ग कधी संपुष्टात येईल हे सांगणे सद्यस्थितीत अवघड आहे. चीन आणि इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग 6 व्या टप्प्यात पोहोचल्याचे भार्गव म्हणाले.
विषाणू मर्यादित ठिकाणीच
प्रवासाचा इतिहास असलेल्या लोकांमध्येच कोरोना संसर्ग आढळून आला आहे. या लोकांनी विषाणूने ग्रस्त देशांचा प्रवास केला होता. तर कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली आहे. सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसून येणाऱया लोकांनी तपासणी करून घेण्याची गरज नाही. विषाणूचा प्रभाव देशात मर्यादित ठिकाणीच असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे मुख्य महामारी तज्ञ डॉ. आर.आर. गंगाखेडकर यांनी दिली आहे.
प्रयोगशाळांचे जाळे
आयसीएमआरने देशभरात 106 विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांचे जाळे तयार केले आहे. या प्रयोगशाळांमध्ये संशयित लोकांच्या गळय़ातील द्रवणाचे नमुने तपासले जात आहेत. विषाणूने महामारीचे रुप धारण केल्यास देशात तपासणीसाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे. सद्यकाळात 51 प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची तपासणी केली जात आहे. या प्रयोगशाळांची प्रतिदिन 4590 नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे.









