वृत्तसंस्था/ कैरो
येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने 25 मी. पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत भारतीय महिलांनी सिंगापूरचा 17-13 अशा फरकाने पराभव केला. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे.
राही सरनोबत, ईशा सिंग व रिदम सांगवान यांनी सिंगापूरच्या झियु हाँग, शुक झी, लिंग चियाव निकोल यांचा पराभव केला. ईशा सिंगचे हे दुसरे तर या वर्ल्ड कपमधील तिसरे पदक आहे. तिने याआधी महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल सांघिक नेमबाजीत सुवर्ण मिळविले तर महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल वैयक्तिक नेमबाजीत रौप्यपदक मिळविले आहे. याशिवाय भारताच्या श्रीयांका सदनगी व अखिल शेरॉन यांनी 50 मी. रायफल 3 पोझिशन्स मिश्र सांघिक प्रकारात ऑस्ट्रियाच्या रेबेका कोएक आणि गेमॉट रम्पलर यांच्यावर 16-10 अशी मात करून कांस्यपदक मिळविले.









