सीमेवरील स्थिती अधिक जटिल न करण्याचा चीनने दिला सल्ला
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनला लागून असलेल्या सीमावर्ती क्षेत्रात भारताने 44 नवे पूल निर्माण केले आहेत. भारताच्या या पायाभूत सुविधांमुळे चीन बिथरला आहे. नव्या पूलांच्या निर्मितीबद्दल चिंता व्यक्त करत चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी कुठल्याही बाजूने स्थिती अधिक जटिल होईल अशाप्रकारचे पाऊल या भागात उचलू नये असे मंगळवारी म्हटले आहे. सैन्य देखरेख आणि नियंत्रणासाठी कुठल्याही प्रकारच्या पायाभूत प्रकल्पांना विरोध असल्याचे चीनकडून सांगण्यात आले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बीआरओकडून 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या पूलांचे उद्घाटन केले होते. हे पूल 286 कोटी रुपयांच्या खर्चातून तयार करण्यात आले आहेत.
चीन भारताला लागून असलेल्या भागात रस्ते तसेच सैन्यतळ निर्माण करत आहे. विरोधाभास म्हणजे चीन भारतावरच स्थिती जटिल करण्याचा आरोप करत आहे. चीनने सीमावर्ती भागात सैन्यतळ उभारण्याचे काम हाती घेत त्यांचे आधुनिकीकरण करत आहे. चीनने या सैन्यतळांवर घातक शस्त्रास्त्रs आणि क्षेपणास्त्रsही तैनात केली आहेत.
बीआरओचा विक्रम
चीनच्या याच आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारत वेगाने सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणत आहे. संरक्षणमंत्र्यांनी याचबरोबर नेचिफू भुयाराच्या कामाचा शुभारंभ केला आहे. बीआरआने एका वर्षात 54 पुलांची निर्मिती करून विक्रम केला आहे.
मोठी मदत
संरक्षणमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पुलांपैकी 10 पूल जम्मू-काश्मीरमध्ये, 7 लडाखमध्ये, 2 हिमाचल प्रदेशात, 4 पंजाबात, 8 उत्तराखंड, 8 अरुणाचल प्रदेश आणि 4 पूल सिक्कीम आहेत. यातील 22 पूल भारत-चीन सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या पूलांच्या निर्मितीनंतर चीन सीमेपर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सामरिक महत्त्व असलेल्या अटल भुयाराचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी केले होते. नव्या सुविधांमुळे भारतीय सैन्याला अवजड यंत्रसामग्री सीमेपर्यंत नेण्यास मदत होणार आहे.









