वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व युवा युष्टीयुद्ध स्पर्धेत शनिवारी भारताच्या पाच मुष्टीयोद्धय़ांनी आपल्या वजनगटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. पोलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूष गटातील् चार तर महिला गटातील एका भारतीय स्पर्धकांने शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे.
भारताचा 64 किलो वजनगटातील आशियाई रौप्यपदक विजेता अंकित नरवाल, 49 किलो वजनगटात विश्वामित्र चोगथेम, 56 किलो वजनगटात सचिन, 91 किलो वजनगटात विशाल गुप्ता, तसेच महिलांच्या विभागात 48 किलो वजनगटात गितिका यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिलांच्या 64 किलो वजनगटात भारताच्या निशा गुर्जरचे आव्हान लॅटव्हियाच्या रोझेनटेलने 4-1 असे संपुष्टात आणले. 48 किलो वजनगटात गितिकाने कझाकस्तानच्या मॅरेटचा 5-0 असा पराभव केला. पुरूषांच्या 49 किलो वजनगटात भारताच्या विश्वामित्र चोंगथेमने के. मेहदीचा 5-0 असा पराभव केला. 56 किलो वजनगटात सचिनने व्हॅलेडेजवर एकतर्फी विजय मिळविला. 64 किलो गटात अंकित नरवालने पोलंडच्या झेमोजेस्कीवर 4-1 तसेच 91 किलो गटात भारताच्या विशाल गुप्ताने क्रोएशियाच्या लॉनकेरिकचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत 52 देशांचे सुमारे 414 स्पर्धक सहभागी झाले आहेत. भारताचा 20 जणांचा चमू या स्पर्धेत खेळत आहे.









