वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धेला आता चार महिने बाकी राहिले असतानाच बीसीसीआयने येत्या नोव्हेंबरमध्ये यू-19 क्रिकेटला पुन्हा प्रारंभ करण्याची योजना आखली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताने सरावासाठी स्पर्धा भरविण्याची योजना आखली असून यामध्ये बांगलादेश आणि लंका युवा संघांना निमंत्रित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे या सरावाच्या स्पर्धेत भारताचे दोन संघ खेळविण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे 2020 च्या मार्चनंतर क्रिकेट क्षेत्रातील सर्व हालचाली ठप्प झाल्या होत्या. आयसीसीची आगामी 19 वर्षांखालील वयोगटातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा विंडीजमध्ये येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. देशातील 2021 च्या क्रिकेट हंगामाला पहिल्या राष्ट्रीय 19 वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धेने प्रारंभ केला जाणार आहे. विनू मंकड चषक क्रिकेट स्पर्धेला सप्टेंबरच्या तिसऱया आठवडय़ात प्रारंभ होईल. त्यानंतर चॅलेंजर्स चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे.









