हरनूर सिंगचे शतक, हंगरगेकरची अष्टपैलू चमक, यशचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ दुबई
हरनूर सिंगने नोंदवलेले शानदार शतक व गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी यांच्या बळावर भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाने यू-19 आशिया चषक स्पर्धेची विजयी सुरुवात करताना संयुक्त अरब अमिरातवर 154 धावांनी दणदणीत विजय मिळविला. अन्य सामन्यात लंका व पाकिस्तानच्या युवा संघांनी विजय मिळविले.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 282 धावा फटकावल्या. हरनूर सिंगने 130 चेंडूत 11 चौकारांसह 120 तर यश धुळने 4 चौकारांसह 68 चेंडूत 63 धावा केल्या. याशिवाय राजवर्धन हंगरगेकरने अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करून 23 चेंडूतच नाबाद 48 धावा फटकावल्या. त्यात 6 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. आयसीसी अकादमी ग्राऊंंडवर झालेल्या या सामन्यात यूएईने 9 गोलंदाजांचा वापर केला. यजमान संघाच्या फलंदाजांना भारताचे हे आव्हान पेलवले नाही आणि 34.3 षटकांतच त्यांचा डाव 128 धावांत संपुष्टात आला. हंगरगेकरने 3 बळी मिळविले तर गर्व सांगवान, विकी ओसवाल, कौशल तांबे यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
अन्य सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 4 गडय़ांनी पराभव केला तर लंकेने कुवैतचा 274 धावांनी एकतर्फी फडशा पाडला. अफगाणचा डाव केवळ 52 धावांत गुंडाळल्यानंतर पाकने 16.4 षटकांत 6 बाद 53 धावा जमवित विजय मिळविला. लंकेने 50 षटकांत 5 बाद 323 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुवैतचा डाव 17.3 षटकांत 49 धावांत गुंडाळून 274 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पुढील वर्षी विंडीजमध्ये यू-19 विश्वचषक स्पर्धा होणार असून त्याच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा आशियाई संघांना उपयुक्त ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः यू-19 भारत 5 बाद 282 (हरनूर सिंग 120, यश धुळ 68, राजवर्धन हंगरगेकर 23 चेंडूत नाबाद 48, शेख रशीद 35, अलिशान शरफू 2-44, आयाज अफजल खान 1-38), यू-19 संयुक्त अरब अमिरात 34.3 षटकांत सर्व बाद 128 (के.स्मिथ 45, धुव पराशर 19, अलिशान शरफू 13, सूर्या सतीश 21, हंगरगेकर 3-44, सांगवान 2-39, विकी ओसवाल 2-7, कौशल तांबे 2-16).
1) यू-19 लंका 5 बाद 323, कुवैत 17.3 षटकांत सर्व बाद 49, 2) अफगाण 52, पाकिस्तान 16.4 षटकांत 6 बाद 53.









