दुसऱया टी-20 सामन्यातही किवीज संघाला लोळवले, 7 गडी राखून एकतर्फी विजय, घरच्या मैदानावरच न्यूझीलंडची धुळदाण
ऑकलंड/ वृत्तसंस्था
टी-20 मालिकेवरील आपली पकड आणखी भक्कम करताना भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला सलग दुसऱयांदा धूळ चारली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ‘पॉकेट साईज’ ईडन पार्कवरील लढतीत 133 धावांचा पाठलाग करणे हा भारतीय संघासाठी अक्षरशः ‘केकवॉक’ ठरला. प्रारंभी, भारताने किवीज संघाला निर्धारित 20 षटकात 5 बाद 132 धावांवर रोखण्याची किमया साधली व नंतर केएल राहुल (नाबाद 57), श्रेयस अय्यर (44) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
किवीज संघाने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर आश्चर्यकारकरित्या फलंदाजी स्वीकारली. रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी यांचा नियंत्रित टप्प्यावरील मारा निर्णायक ठरला. प्रत्युत्तरात केएल राहुलने 50 चेंडूत नाबाद 57 धावा फटकावल्या तर श्रेयस अय्यरने 33 चेंडूत जलद 44 धावांचे योगदान दिले. रोहित सलग दुसऱयांदा स्वस्तात बाद झाल्यानंतर या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 86 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली आणि इथेच भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला गेला.
रोहित (8) व कर्णधार विराट (11) या दिग्गज फलंदाजांना स्वस्तात बाद करणाऱया टीम साऊदीने 20 धावात 2 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले. राहुल व कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी 31 धावा जोडल्या. टीम सेफर्टने हवेत झेपावत अप्रतिम झेल घेत विराटची खेळी संपुष्टात आणली.
त्यानंतर राहुल व अय्यर यांनी मात्र स्ट्राईक रोटेट करत 55 चेंडूतच अर्धशतकी भागीदारी फलकावर लावली. राहुलने आपले 11 वे टी-20 अर्धशतक 43 चेंडूत पूर्ण केले. राहुलने 3 चौकार व 2 षटकार तर अय्यरने 1 चौकार व 3 षटकार फटकावले. भारताने 15 व्या षटकात 100 धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर अय्यरने जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली. याच प्रयत्नात तो ईश सोधीच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, केएल राहुलने एक बाजू लावून धरताना शिवम दुबेच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. मिडविकेटच्या दिशेने षटकार खेचत राहुलने विजयाचे लक्ष्य गाठून दिले.
किवीजना प्रतिकूल खेळपट्टीचा फटका
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱया किवीज संघाला हा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. मार्टिन गप्टीलने 20 चेंडूत 33 तर टीम सेफर्टने 26 चेंडूत नाबाद 33 धावांचे योगदान दिले. गप्टील व कॉलिन मुन्रो (26) या जोडीने प्रारंभी 48 धावांची सलामी दिली. शार्दुल ठाकुर (1-21) व मोहम्मद शमी (0-22) यांनी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली तर जसप्रित बुमराहला (1-21) उशिराने आक्रमणावर आणले गेले.
शार्दुल ठाकुरने सहाव्या षटकात गप्टीलला बाद केल्याने ही खेळी फलद्रूप ठरली. दुबेने मुन्रोला 9 व्या षटकात बाद केले तर ग्रँडहोम (3) स्वस्तात बाद झाला. जडेजाकडे त्याने परतीचा झेल दिला. कर्णधार केन विल्यम्सनने डीपवर तैनात चहलकडे झेल दिला आणि जडेजासाठी हा दुसरा बळी ठरला. रॉस टेलरही (18) येथे स्वस्तात बाद झाला. या लढतीत यजुवेंद्र चहल (0-33) व शिवम दुबे (1-16) यांनी पॉवर प्लेमध्ये उत्तम गोलंदाजी केली. रविंद्र जडेजाने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 18 धावात 2 बळी असे लक्षवेधी पृथक्करण साकारले.
धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गप्टील झे. कोहली, गो. शार्दुल 33 (20 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), कॉलिन मुन्रो झे. कोहली, गो. दुबे 26 (25 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार) केन विल्यम्सन झे. चहल, गो. जडेजा 14 (20 चेंडू), कॉलिन डे ग्रँडहोम झे. व गो. जडेजा 3 (5 चेंडू), रॉस टेलर झे. शर्मा, गो. बुमराह 18 (24 चेंडू), टीम सेफर्ट नाबाद 33 (26 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), मिशेल सॅन्टनर नाबाद 0. अवांतर 5. एकूण 20 षटकात 5 बाद 132.
गडी बाद होण्याचा क्रम
1-48 (गप्टील, 5.6), 2-68 (मुन्रो, 8.4), 3-74 (ग्रँडहोम, 10.2), 4-81 (विल्यम्सन, 12.3), 5-125 (रॉस टेलर, 19.4).
गोलंदाजी
शार्दुल ठाकुर 2-0-21-0, शमी 4-0-22-0, बुमराह 4-0-21-1, चहल 4-0-33-0, शिवम दुबे 2-0-16-1, रविंद्र जडेजा 4-0-18-2.
भारत : रोहित शर्मा झे. टेलर, गो. साऊदी 8 (6 चेंडूत 2 चौकार), केएल राहुल नाबाद 57 (50 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), विराट कोहली झे. सेफर्ट, गो. साऊदी 11 (12 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर झे. साऊदी, गो. सोधी 44 (33 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), शिवम दुबे नाबाद 8 (4 चेंडूत 1 षटकार). अवांतर 7. एकूण 17.3 षटकात 3 बाद 135.
गडी बाद होण्याचा क्रम
1-8 (रोहित, 0.6), 2-39 (विराट, 5.2), 3-125 (श्रेयस, 16.3).
गोलंदाजी
टीम साऊदी 3.3-0-20-2, हेन्री बेनेट 3-0-29-0, टिकनर 3-0-34-0, सॅन्टनर 4-019-0, सोधी 4-0-33-1.
षटकनिहाय धावसंख्या
संघ / 5 षटके / 10 षटके / 15 षटके / 20 षटके
न्यूझीलंड / 0-39 / 2-73 / 4-94 / 5-132
भारत / 1-39 / 2-60 / 2-103 / 3-135 (17.3)









