संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणातून स्थिती स्पष्ट
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने आपल्या मध्यपूर्वेच्या धोरणात प्रथमच लक्षात येईल असे परिवर्तन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत आणि सर्वसाधारण सभेत भारताने इस्रायलच्या पक्षाकडे आपला कल दाखविला. या दोन्ही स्थानी भारताच्या प्रतिनिधींनी केलेल्या भाषणातून हे परिवर्तन झाल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंतच्या इतिहासात भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघात केलेल्या भाषणांमध्ये ‘पॅलेस्टाईनी जनतेच्या न्याय्य अधिकारांचे आम्ही भक्कम समर्थन करतो. तसेच द्विराष्ट्र तोडग्यानेच हा प्रश्न सुटू शकेल असा आमचा विश्वास आहे,’ अशी दोन वाक्ये आवर्जून उच्चरली जात. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारतात स्थानापन्न झाल्यानंतरही ही भूमिका घेतली जात होती. तथापि, तज्ञांच्या म्हणण्यानुसार इतिहासात प्रथमच भारताच्या प्रतिनिधींनी भाषण करताना ही दोन वाक्ये टाळली. 20 मे या दिवशी सर्वसाधारण सभेत भारताच्या या नव्या धोरणाचे प्रत्यंतर आले.
हमासचा निषेध
भारताने यावेळी प्रथमच इस्रायल-पॅलेस्टाईन या संघर्षात हमास या दहशतवादी संघटनेचा निषेध केला. हमासने इस्रायलवर अग्निबाणांचा वर्षाव केल्याने दोघांमधील संघर्ष पेटला होता. हमासच्या या कृतीचा भारताने स्पष्ट शब्दांमध्ये निषेध केला. हमासच्या या हल्ल्यात इस्रायलमध्ये काम करणाऱया एका भारतीय परिचारिकेचाही मृत्यू झाला होता. भारताने सुरक्षा परिषदेत केलेल्या भाषणात दोन्ही बाजूंकडून शांतता पाळण्यात यावी असे आवाहन करण्यात आले होते. तथापि, सर्वसाधारण सभेत एक प्रकारे इस्रायलकडे कल दाखविण्यात आला होता.
भविष्यातील पावले महत्वाची
भविष्यात भारत या संदर्भात कोणते पावले उचलतो याकडे आता अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. भारताने इस्रायलकडे दाखविलेला कल सातत्यपूर्ण राहिला तर भारताच्या धोरणातील ते सर्वात मोठे आणि महत्वाचे परिवर्तन ठरणार आहे. तसेच भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंधांमध्येही यामुळे अधिक जवळीक निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.









