आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धा : किवीज संघातर्फे सॅटरवेटचे अर्धशतक, ऍमेलिया केरचे अष्टपैलू योगदान, हरमनप्रीतची 71 धावांची खेळी निष्फळ

वृत्तसंस्था /हॅमिल्टन
हरमनप्रीत कौरच्या 71 धावांच्या संघर्षमय खेळीनंतरही भारताला आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 62 धावांनी पराभव पत्करावा लागला. येथील सेडॉन पार्कवर रंगलेल्या या लढतीत न्यूझीलंडने 50 षटकात 9 बाद 260 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारताचा डाव 46.4 षटकात सर्वबाद 198 धावांवर आटोपला.
किवीज संघातर्फे ऍमेलिया केरने अष्टपैलू योगदान देताना प्रारंभी फलंदाजीत अर्धशतक साजरे केले व नंतर गोलंदाजीत 3 बळी घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. तिने मिताली, हरमनप्रीत व रिचा घोष यांना तंबूचा रस्ता दाखवला.
विजयासाठी 261 धावांचे संरक्षण करताना किवीज गोलंदाजांनी भारतावर सातत्याने दडपण राखले. भारतीय सलामीवीर यास्तिका भाटिया व स्मृती मानधना यांना बरेच झगडावे लागले आणि त्यानंतर भारताला या लढतीत फारशी आशा नसेल, असे चित्र स्पष्ट झाले. खराब फॉर्ममधील शफाली वर्माऐवजी यास्तिकाला येथे बढतीवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
स्मृती मानधना दडपण झुगारुन टाकण्याच्या इराद्याने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जेस्स केरचे सावज ठरली. तिसऱया स्थानावरील दीप्ती शर्मा देखील फार काळ तग धरु शकली नाही. दीप्तीला ली हिने 5 धावांवर पायचीत केले. न्यूझीलंडने यशस्वी रिव्हय़ू घेतल्यानंतर दीप्तीला तंबूत परतावे लागले आणि भारताची 2 बाद 26 अशी स्थिती झाली.
यास्तिका भाटिया देखील फारशी चमक दाखवू शकली नाही. तिने लीच्या गोलंदाजीवर दुसऱया स्लीपमध्ये सोपा झेल दिला. विजयासाठी 261 धावांचा पाठलाग करताना भारताची 25 षटकात 3 बाद 75 अशी स्थिती होती आणि अद्याप धावांचा डोंगर सर करणे बाकी होते. त्यातच ऍमेलियाने 30 व्या षटकात मिताली राज व रिचा घोष यांना सलग चेंडूंवर बाद करत भारताच्या अडचणीत आणखी भर टाकली. त्यानंतर भारतीय फलंदाज ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिले आणि संघाचा पूर्ण डाव सर्वबाद 198 धावांमध्ये आटोपला.
पूजा वस्त्रकारचे 4 बळी

प्रारंभी, पूजा वस्त्रकारने 4 बळी घेतल्यानंतर भारताने न्यूझीलंडला 50 षटकात 9 बाद 260 धावांवर रोखून धरले. ऍमी सॅटरवेट व ऍमेलिया केर यांनी अनुक्रमे 75 व 50 धावांची खेळी साकारली. पूजाने 4 बळी घेतले. शिवाय, सलामीवीर सुझी बेट्सला 5 धावांवर धावचीत करण्यात मोलाचा वाटा उचलला. राजेश्वरी गायकवाडने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : 50 षटकात 9 बाद 260 (ऍमे सॅटरवेट 84 चेंडूत 9 चौकारांसह 75, ऍमेलिया केर 64 चेंडूत 5 चौकारांसह 50, कॅटे मार्टिन 51 चेंडूत 3 चौकारांसह 41, सोफी डीव्हाईन 30 चेंडूत 35. अवांतर 10. पूजा वस्त्रकार 10 षटकात 34 धावात 4 बळी, राजेश्वरी गायकवाड 2-46, झुलन गोस्वामी 1-41, दीप्ती शर्मा 1-52).
भारत : 46.4 षटकात सर्वबाद 198 (हरमनप्रीत कौर 63 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 71, मिताली राज 56 चेंडूत 1 चौकारासह 31, यास्तिका भाटिया 59 चेंडूत 2 चौकारांसह 28, स्नेह राणा 18. अवांतर 6. ली ताहूहू 10 षटकात 17 धावात 3 बळी, ऍमेलिया केर 9 षटकात 3-56, जेन्सेन 2-30, जेस्स केर, रोव्ह प्रत्येकी 1 बळी).
झुलन गोस्वामीची वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बळीच्या विक्रमाशी बरोबरी

भारताची अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामीने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात लिन फुलस्टॉनच्या सर्वाधिक बळीच्या विक्रमाशी बरोबरी केली. या दोघींच्या खात्यावर आता प्रत्येकी 39 बळी आहेत.
39 वर्षीय झुलन गोस्वामीसाठी ही पाचवी विश्वचषक स्पर्धा असून न्यूझीलंडच्या यष्टीरक्षक-फलंदाज केट मार्टिनला डावातील 50 व्या षटकात बाद करत झुलनने सर्वोच्च विक्रमाशी बरोबरी साधली. यापूर्वी, 1982 ते 1988 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱया फुलस्टॉनने 20 सामन्यात 39 बळी घेतले. झुलनने आपल्या 30 व्या सामन्यात 39 वा बळी नोंदवला.
इंग्लंडची माजी फिरकीपटू कॅरोल ऍन होजेस 24 सामन्यात 37 बळींसह दुसऱया स्थानी विराजमान आहे. दोन दशकांपूर्वी जानेवारी 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या झुलन गोस्वामीला ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखले जाते. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम तिच्या खात्यावर आहे. तिने आजवर खेळलेल्या 197 वनडे सामन्यात 248 बळी घेतले आहेत.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत झुलन भारतीय संघासाठी गोलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ राहिली असून तिने याशिवाय, 12 कसोटी सामन्यात 44 तर 68 टी-20 सामन्यात 56 बळी देखील नोंदवले आहेत.

अन्य संघ सहजपणे 250 ते 260 धावांचा टप्पा गाठत असल्याने आपणही आक्रमक पवित्र्यावर भर देणे क्रमप्राप्त आहे. फलंदाजीत विशेषतः आघाडी व मध्यफळीतील फलंदाजांनी अधिक लक्षवेधी योगदान दिले तरच निभाव लागू शकेल. खेळपट्टी फलंदाजीला पोषक नसल्याचा आम्हाला येथे फटका बसला.
-भारतीय कर्णधार मिताली राज

स्ट्राईक रोटेशनमधील अपयशाचा आम्हाला आणखी एकदा फटका बसला. आघाडी फळीतील फलंदाजांकडून अधिक अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली. पहिल्या 10-15 षटकात अधिक धावा नोंदवणे महत्त्वाचे आहे. त्या धर्तीवर फलंदाजी लाईनअपमधील बदलाचा विचार करावा लागेल.
-भारताचे फलंदाजी प्रशिक्षक शिव सुंदर दास.

सर्व आघाडय़ांवर उत्तम वर्चस्व गाजवल्याने आम्हाला येथे भारताविरुद्ध सहज विजय संपादन करता आला. सॅटरवेटच्या दमदार फलंदाजीमुळे आम्ही सहजपणे अडीचशे धावांचा टप्पा सर करत भारतावर दडपण आणू शकलो. आमच्या गोलंदाजांनीही आपली जबाबदारी अतिशय चोख पार पाडली.
-किवीज संघाची कर्णधार सोफी डीव्हाईन









