ऑनलाईन/टीम
काबूल: पाकिस्तान, चीन पाठोपाठ आता भारताचा जवळचा मित्र रशिया सुद्धा तालिबानच्या बाजूने झुकल्याचे दिसत आहे. रशियाचे अफगाणिस्तानातील राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांनी तालिबानच्या वर्तनाचं कौतुक केलं आहे.
एकीकडे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी अशरफ घनींच्या नेतृत्वात असलेल्या सरकारला जबाबदार धरलं असून दुसरीकडे रशियानं अशरफ घनी यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, असं करताना रशियानं अमेरिकेच्याही एक पाऊल पुढे जात तालिबान्यांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, रशियाचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांनी तालिबानच्या वर्तनाचं कौतुक केलं आहे. तालिबानची भूमिका चांगली, सकारात्मक आणि व्यवसाय अनुकूल असल्याचे दिमित्री म्हणाले. “या कट्टरपंथीय इस्लामिक गटाने आधीच्या राज्यकर्त्यांपेक्षा २४ तासात काबुलला सुरक्षित बनवले” असे दिमित्री यांनी मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा केला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिक देश सोडण्यासाठी पळापळ करत आहेत. विमानतळावर गर्दी होत आहे. काबुल विमानतळ अमेरिकेने ताब्यात घेतल्यामुळे देश सोडण्यासाठी नागरिकांकडे काबुल विमानतळ हा एकच पर्याय उरला आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून लाखो नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली आहे.