अफगाणवर 4 गडय़ांनी विजय
वृत्तसंस्था/ दुबई
सातव्या गडय़ासाठी राज बावा व कौशल तांबे यांनी नोंदवलेल्या अभेद्य 65 धावांच्या भागीदारीमुळे भारताच्या युवा संघाने यू-19 आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा 4 गडय़ांनी पराभव करीत उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले.
260 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 6 बाद 197 असा अडचणीत आला होता. पण बावा (नाबाद 43) व तांबे (नाबाद 35) यांनी संयमी अर्धशतकी भागीदारी करीत 10 चेंडू बाकी असताना संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर हरनूर सिंग पन्नू (65) व अंगकृश रघुवंशी (35) यांनी भारताला 104 धावांची भक्कम सलामी दिली होती. पण मध्यफळीतील कर्णधार यश धुळ (26) व निशांत सिंधू (19) यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. नंतर बावा व तांबे यांनी संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारत गटात पाकनंतर दुसऱया स्थानावर असून बांगलादेश व लंका यांच्यातील विजयी संघाविरुद्ध भारताची पुढील लढत होईल. पाकने आपले सर्व सामने जिंकून अग्रस्थान मिळविले आहे.
अफगाणने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर कर्णधार सुलिमान सफी (73) व इजाझ अहमद अदमदझाई (68 चेंडूत नाबाद 86) यांच्या अर्धशतकांमुळे 50 षटकांत 4 बाद 259 धावा जमविल्या. भारताच्या राज बावा, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओसवाल यांनी एकेक बळी मिळविले. संक्षिप्त धावफलक ः यू-19 अफगाण 50 षटकांत 4 बाद 259 (इजाझ अहमद अहमदझाई नाबाद 86, सफी 73, तांबे 1-25, हंगरगेकर 1-74, तांबे 1-25, ओसवाल 1-35), यू-19 भारत 48.2 षटकांत 6 बाद 262 (हरनूर सिंग 65, बावा नाबाद 43, नूर अहमद 4-43).









