एफआयएच हॉकी लीग दुसरी फेरी : वर्ल्ड चॅम्पियनला रोखण्याचे यजमानांसमोर आव्हान
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्याच फेरीत यश मिळविल्यानंतर मनोबल उंचावलेला भारतीय हॉकी संघ आता दुसऱया फेरीत वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमचे आव्हान परतावून लावण्यास सज्ज झाला आहे. येथील कलिंगा स्टेडियमवर शनिवारी या दोन संघांत पहिला सामना होणार आहे.
2019 मध्ये झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत भारताने भाग घेतला नव्हता. पण यावर्षी त्यांनी या लीगमध्ये स्वप्नवत पदार्पण करताना नेदरलँड्सवर विजय मिळवित 5 गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया भारताने नेदरलँड्सवर पहिल्या सामन्यात 5-2 अशी मात केली. त्यानंतर दुसऱया सामन्यात निर्धारित वेळेत 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा विजय मिळविला. त्यानंतर भारताचा या लीगमधील सामना झाला नसल्याने ते गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर घसरले आहेत. बेल्जियमने सध्या चार सामन्यांतून 11 गुण घेत पहिले स्थान मिळविले आहे तर नेदरलँड्सने तितक्याच सामन्यांतून 7 गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे.
ऑस्ट्रेलिया चार सामन्यांतून 6 गुण घेत तिसरे, त्यानंतर जर्मनीने चौथे व भारताने पाचवे स्थान मिळविले आहे. भारताने जरी या लीगमध्ये आश्वासक सुरुवात केली असली तरी त्यांना बलाढय़ बेल्जियमकडून कडवा प्रतिकार होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे बेल्जियमने कलिंगा स्टेडियमवरच 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अग्रस्थान पटकावलेल्या बेल्जियमने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळविले असल्याने त्यांचाही आत्मविश्वास उंचावलेला आहे. मात्र त्यांचा कर्णधार थॉमस ब्राएल्सने यजमान भारताकडून कडवे आव्हान मिळण्याची अपेक्षा असल्याचे मान्य केले आहे.
नेदरलँड्सवर विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे बदललेला असेल, असे त्याला वाटते. ‘भारतीय संघ अतिशय शार्प झाला असून खूप चांगले प्रदर्शन त्यांच्याकडून होत असल्याचे आम्ही डचविरुद्धच्या सामन्यांत पाहिले आहे,’ असे ब्राएल्स येथे आगमन झाल्यानंतर म्हणाला होता. पुढील दोन सामने आम्हाला खूप कठीण असणार आहेत आणि आमच्यासाठीही ही चांगली लढत असेल. भारत हा आम्हाला धक्का देऊ शकेल असा संघ असल्याने आम्हाला त्याची चिंता आहेच. पण अशा कठीण संघाविरुद्ध खेळल्यामुळेच आम्हाला सुधारणा करण्याची संधीही ऑलिम्पिकपूर्वी मिळाणार आहे, असेही तो म्हणाला.
भारत हा यजमान संघ असल्याने त्यांच्यासाठी हे घरचे मैदान आहे. मात्र बेल्जियमसाठी हे लकी मैदान असून याच ठिकाणी त्यांनी वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढलेला असेल. ‘आम्ही वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या शहरात आलो असल्याने येथे खेळताना आम्हालाही आनंदच वाटणार आहे. या मैदानाच्या आमच्याकडे खूप चांगल्या आठवणी असल्याने त्यावर पाऊल ठेवताना आमचा आत्मविश्वासही वाढलेला असेल,’ असेही तो म्हणाला. भारत व बेल्जियम यांच्यात येथे एकूण 10 सामने झाले असून बेल्जियमने आठवेळा विजय मिळविला तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. असा इतिहास असला तरी नेदरलँड्सविरुद्ध खेळताना भारताचे वेगळे रूप दिसले होते. त्याच जोमाने या लढतीतही भारतीय संघ खेळला तर बेल्जियमला पराभवाचा धक्का देणे कठीण जाणार नाही.
प्रो हॉकी लीगमुळे हॉकी खेळणाऱया सर्वच देशांना ऑलिम्पिक तयारीसाठी व्यासपीठ मिळाले आहे. या संधीचा पुरेपूर लाभ उठविण्यासाठी ग्रॅहम रीड यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघ प्रयत्न करणार आहे. बेल्जियमविरुद्धच्या लढतीनंतर भारताच्या लढती 21 व 22 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातच होतील. त्यानंतर भारतीय संघ जर्मनीला जाणार असून त्यांच्याविरुद्ध 25 व 26 एप्रिल रोजी, ग्रेट ब्रिटनविरुद्ध 2 व 3 मे रोजी, अर्जेन्टिनाविरुद्ध 5 व 6 जून रोजी आणि स्पेनविरुद्ध 13 व 14 जून रोजी सामने खेळणार आहे.









