वेलिंग्टन / वृत्तसंस्था :
किवीज भूमीत सलग तीन टी-20 सामन्यांसह मालिका जिंकल्यानंतर आज (दि. 31) चौथ्या लढतीत भारतीय संघाकडे नवे प्रयोग राबवून पाहण्याची संधी असेल. पण, यजमान संघाविरुद्ध क्लीन स्वीप हेच पुढील लक्ष्य असेल, असे संघव्यवस्थापनाचे संकेत आहेत. उभय संघातील या लढतीला दुपारी 12.30 वाजता सुरुवात होईल.
मोहम्मद शमी व रोहित शर्मा यांनी यापूर्वी तिसऱया टी-20 लढतीत भारताला रोमांचक विजय प्राप्त करुन दिला आणि भारताने त्याचवेळी न्यूझीलंडच्या भूमीत पहिलावहिला टी-20 मालिकाविजय संपादन केला. आता शुक्रवार व रविवारी अनुकमे वेलिंग्टन व माऊंट माऊन्गनुई येथे उर्वरित दोन लढतीत उरलीसुरली पत राखण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असणार आहे.
वर्ल्डकपपूर्वीची रंगीत तालीम
एरवी 5 सामन्यांची टी-20 मालिका भरवली जाणे दुर्मीळ. पण, ऑस्ट्रेलियातील आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी ही मालिका त्याची रंगीत तालीमच असणार आहे. सध्याच्या घडीला भारतासमोर नवे प्रयोग राबवणे आणि विजयात सातत्य राखण्याचा समतोल सांभाळण्याचे लक्ष्य असणार आहे.
क्लीन स्वीप हेच मुख्य लक्ष्य
कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही मालिका 5-0 अशा फरकाने जिंकण्यावरच आपला मुख्य भर असेल, असे स्पष्ट केले आहे. स्वतः विराटने सेडॉन पार्कवरील लढतीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत याचा उल्लेखही केला. त्यामुळे, भारतीय संघ उर्वरित लढतीत देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, हे स्पष्ट आहे.
संजू सॅमसन व ऋषभ पंत या मालिकेत अद्याप संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असून कोणत्या फलंदाजाला विश्रांती दिली जाणार, यावर पंतला संधी मिळणार का, हे अवलंबून असणार आहे. केएल राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी कायम असेल का, हे देखील त्याचवेळी निश्चित होईल.
रोहित शर्मा, केएल राहुल, कर्णधार विराट व श्रेयस अय्यर या पहिल्या चार फलंदाजांमध्ये काही बदल केला जाणार का, तसेच कोहली, रोहित यांना उर्वरित दोन लढतीत प्रत्येकी एका लढतीतून विश्रांती दिली जाणार का, हे पहावे लागेल. गोलंदाजीत काही बदल अपेक्षित धरले तर वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, नवदीप सैनी संधीच्या प्रतिक्षेत आहेत. ऑस्ट्रेलियातील मोठय़ा मैदानांवर वॉशिंग्टन सुंदर नव्या चेंडूवर उत्तम मारा करु शकेल, असा विराटचा होरा आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टील, रॉस टेलर, स्कॉट कग्लेईन, कॉलिन मुन्रो, टॉम ब्रुस, डॅरेल मिशेल, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बेनेट, ईश सोधी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनर.
सामन्याची वेळ : दुपारी 12.30 पासून.
बुमराहला विश्रांती मिळणार का?
जसप्रित बुमराहला खेळवणार की विश्रांती देणार, याची आजच्या लढतीत मुख्य उत्सुकता असेल. बुमराहचा यानंतर वनडे व कसोटी मालिकेत सहभाग आहे. शिवाय, टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याच्यावरच भारताची मुख्य भिस्त असणार आहे. त्यामुळे त्याच्यावर अतिभार पडू नये, या दृष्टिकोनातून त्याला विश्रांती देण्याबाबत संघव्यवस्थापनात खल सुरु आहे.
2019 वर्ल्डकपनंतर बुमराह, भुवनेश्वर व हार्दिक पंडय़ा या तिन्ही खेळाडूंना मोठय़ा दुखापतींचा सामना करावा लागला असून यामुळे नियोजन व तयारी या दोन्ही आघाडय़ांवर विचार करत नवे धोरण निश्चित केले जाईल, असे संकेत आहेत.








