लखनौ : यजमान भारत-दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील तिसरा वनडे सामना येथे शुक्रवारी खेळविला जाणार आहे. या सामन्याला शुक्रवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता प्रारंभ होईल. या मालिकेतील दुसरा सामना भारताने जिंकून दक्षिण आफ्रिकेशी बरोबरी साधली असल्याने आता मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपली विजयी जोम कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 8 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली होती. त्यानंतर बुधवारी भारताने दुसरा सामना 9 गडय़ांनी एकतर्फी जिंकून मागील सामन्यातील पराभवाची परतफेड केली,. आता शुक्रवारचा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी तसेच राजेश्वरी गायकवाड, मानसी जोशी यांची गोलंदाजी अचूक राहणे जरूरीचे आहे. स्मृती मानधनाला दुसऱया सामन्यात फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवते तसेच पुनम राऊतची 62 धावांची खेळी निर्णायक ठरली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला दुसऱया सामन्यात सूर मिळाल्याचे दिसून येत आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये पुन्हा मुसंडी मारण्याची क्षमता निश्चितच असल्याने भारताने गाफील राहून चालणार नाही. या सामन्यात सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरू शकेल.
भारताच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लुस तसेच गुडॉल यांना फटकेबाजीपासून रोखावे लागेल. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलसमोर पुन्हा भारतीय फलंदाजीची कसोटी लागणार आहे.









