वृत्तसंस्था/ मुंबई
यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका येत्या जून महिन्यात खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जूनला नवी दिल्लीत खेळविला जाईल.
पाच सामन्यांची ही टी-20 मालिका 11 दिवसांमध्ये होणार असून या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर 19 जूनला खेळविला जाणार आहे. 2022 च्या क्रिकेट हंगामातील मायदेशातील भारतीय संघाची ही तिसरी टी-20 मालिका खेळविली जात आहे. यजमान भारताने यापूर्वी विंडीज आणि श्रीलंकेचा टी-20 मालिकेत 3-0 असा पराभव केला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 प्रकारामध्ये भारताची कामगिरी दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत थोडी सरस आहे. उभय संघात आतापर्यंत 15 सामने झाले असून त्यापैकी भारताने 9 तर दक्षिण आफ्रिकेने सहा सामने जिंकले आहेत. जून महिन्यात होणाऱया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दोन सामन्यांच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. या मालिकेतील 9 जूनचा पहिला सामना चेन्नईऐवजी नवी दिल्लीत तसेच 14 जूनचा तिसरा सामना नागपूर ऐवजी विशाखापट्टणम येथे खेळविला जाईल.
पहिला टी-20 सामना- 9 जून- नवी दिल्ली, दुसरा टी-20 सामना 12 जून-कटक, तिसरा टी-20 सामना 14 जूनला विशाखापट्टणम, चौथा टी-20 सामना 17 जूनला राजकोट तर पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना 19 जूनला बेंगळूरमध्ये खेळविला जाणार आहे.









