वृत्तसंस्था/ पिथोरागढ
भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर तणाव गंभीर होऊ लागला असताना सेना आणि निमलष्करी दलांच्या सहकार्याने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) झटून काम करत असल्याचे दिसून आले आहे. भारताच्या सीमा जेथे जेथे चीनशी जुळलेल्या आहेत त्या सर्व सीमांवर लष्कराची कडेकोट देखरेख असून सैन्य हालचाली करण्याची वेळ आलीच तर त्यासाठी रस्ते, पूल यांच्या दुरुस्त्या युद्धपातळीवर केल्या जात आहेत.
सर्वसाधारणपणे पहाडी भागात असलेले असे बेलीब्रीज मोडले तर ते पुन्हा दुरुस्त करून वापरात आणण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागतो. मात्र बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने हा पूल केवळ सात दिवसात दुरुस्त करून पुन्हा कार्यरत केला आहे. जूनमध्ये याच रस्त्यावर जड बुलडोझर गेल्याने याच प्रकारचा एक पूल तुटला होता तोही बीआरओने पाच दिवसात दुरुस्त करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. उत्तराखंडच्या पिथोरागढ जिल्हय़ातील एक महत्वाचा पूल बीआरओने विक्रमी वेळात दुरुस्त केला आहे. जीमिघाट येथील हा बेलीब्रीज 18 जुलैला भूस्खलनामुळे कोसळला होता. रणनितीच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा आहे.