वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघाचा कर्णधार अरॉन फिंचने भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वकालीन सर्वोत्तम संयुक्त संघाची निवड केली असून या संघामध्ये भारताचा विरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा ऍडॅम गिलख्रिस्ट यांना सलामीच्या जोडीसाठी पसंती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी आपल्या दर्जेदार कामगिरीने वेगळे स्थान निर्माण केले आहे. उभय संघातील सामना पाहण्यासाठी नेहमीच शौकिनांची गर्दी होत असते. फिंचने आपल्या पसंतीचा ऑस्ट्रेलिया-भारत सर्वोत्तम संघ निवडला आहे. सलामीच्या जोडीसाठी सेहवाग आणि रोहित शर्मा यांच्यात निवड करताना आपल्याला खूपच अवघड गेले, असे फिंचने म्हटले आहे. पण माझ्या दृष्टीकोनातून सेहवागला सलामीच्या जोडीसाठी मी पहिली पसंती देतो. कारण मैदानावर तो आल्यानंतर सामना केव्हा संपला, हेच समजत नाही. रोहित शर्मा आणि सेहवाग यांच्यात तुलना केली तर शर्माला मी दुसऱया क्रमांकाची पसंती देतो. शर्माने आतापर्यंत अनेक विक्रम सलामीला खेळताना केले आहेत. सेहवागबरोबर सलामीच्या जोडीसाठी आपण ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज गिलख्रिस्टला पसंती दिली आहे. या सर्वोत्तम संघामध्ये तिसऱया क्रमांकासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, चौथ्या क्रमांकासाठी भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली, पाचव्या क्रमांकासाठी अष्टपैलू हार्दिक पंडय़ा तर सहाव्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलियाच्या अँड्रय़ू सायमंड्सची फिंचने निवड केली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याची सातव्या क्रमांकासाठी निवड केली आहे. धोनीच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेताना तो जगातील सर्वात शांत डोक्मयाचा कर्णधार म्हणून ओळखला जातो, असेही फिंचने म्हटले आहे. संघ दडपणाखाली असताना तो संघाच्या दृष्टीकोनातून शांत विचाराने निर्णय घेत असतो, याची प्रचिती अनेक सामन्यांमध्ये पाहावयास मिळाली आहे. एखाद्या सामन्यात संघाची स्थिती 3 बाद 10 अशी केविलवाणी असताना तो मैदानात आल्यानंतर कोणत्या पद्धतीने फलंदाजी करावयाची याची त्याला चांगलीच जाणीव असते. त्यामुळे अशा स्थितीतूनही आपल्या संघाला त्याने अनेक वेळा सुस्थितीत नेले आहे. वन डे क्रिकेटमध्ये दुसऱयांदा फलंदाजी करून विजय मिळवायचा असेल तर आक्रमक फलंदाजी कशी करावी, याचे तंत्र धोनीला अचूक अवगत असल्याचे त्याने म्हटले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम संघामध्ये ग्लेन मॅकग्रा, ब्रेट लि आणि जसप्रित बुमराह हे गोलंदाजीची बाजू सांभाळतील. फिरकी गोलंदाज बॅड हॉगला आपण हरभजन आणि रविंद्र जाडेजाला डावलून अधिक पसंती दिल्याचे त्याने सांगितले. या तीन खेळाडूंमध्ये निवड करणे कठीण आहे. पण हॉगला स्थान देण्याचा निर्णय मी घेतला आहे, असेही तो म्हणाला.
फिंचचा सर्वकालीन भारत-ऑस्ट्रेलिया संघ- विरेंद्र सेहवाग, ऍडॅम गिलख्रिस्ट, पाँटिंग, कोहली, हार्दिक पंडय़ा, सायमंड्स, धोनी, ब्रेट लि, मॅकग्रा, बुमराह, ब्रॅड हॉग.









