वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट
वनडे मालिका व एकमेव डे-नाईट कसोटीनंतर भारतीय महिला संघ आता तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियन महिलांशी मुकाबला करणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाची मजबुती वाढली असून ही मालिका चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी येथे होत असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.10 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
32 वर्षीय हरमनप्रीतला अंगठय़ाच्या दुखापतीमुळे वनडे मालिका व एकमेव कसोटीपासून अलिप्त रहावे लागले होते. तिच्या पुनरागमनामुळे भारताची फलंदाजी मजबूत झाली आहे. शफाली वर्मा व स्मृती मानधना उत्तम फॉर्ममध्ये असून त्यांच्याकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे. स्मृतीने एकमेव कसोटीत शतक नोंदवल्याने तिचा आत्मविश्वास खूपच उंचावलेला असेल. शफाली सेहवागसारखी आक्रमक खेळणारी असल्याने सर्वांचे तिच्या कामगिरीकडेच लक्ष असेल. भारताने ऑस्ट्रेलियाची सलग 26 वनडे विजयाची मालिका खंडित करण्याचा पराक्रम केल्यानंतर कसोटीतही भारताचे वर्चस्व दिसून आले. पुढील वर्षी वर्ल्ड कप होणार असल्याने त्याच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी उपयुक्त ठरणार आहे. रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया या युवा खेळाडूंची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ अलीकडे अष्टपैलूंवर जास्त प्रमाणात भर देत असल्याचे दिसून आले आहे. या सामन्यातही त्यांच्याच कामगिरीवर लॅनिंगची भिस्त राहील. ते प्रभावी कामगिरी करतील अशी अपेक्षा कर्णधार मेग लॅनिंग करीत आहे.









