प्रतिनिधी/ दापोली
दापोली नगर पंचायतीकडून भाडय़ाने गाळा मिळावा, यासाठी देण्यात येणारा अर्ज मिळावा म्हणून नागरिकांनी शनिवारी नगर पंचायतीमध्ये जाऊन हंगामा केला. 30 मे ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती.
नगर पंचायतीच्यावतीने शहरातील कामगार गल्ली, मच्छीमार्केट, गाडीतळ हॉटेल छाया गल्ली व डॉ. काणे गल्ली येथे सर्व मिळून 140 गाळे बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार भाडेतत्वावर जागा मिळवण्यासाठी 30 मेपर्यंत अर्ज करावेत, अशी नगर पंचायतीने निविदा जाहीर केली होती. मात्र शेवटच्या दिवशी आपल्याला अर्ज मिळाले नाहीत, असा आरोप करून नागरिकांनी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी दालनात हंगामा केला. मात्र मुख्याधिकारी आजारी असल्याने ते रजेवर होते. अखेर त्यांना फोन करून सर्व वस्तूस्थिती सांगण्यात आली. यानंतर मुख्याधिकाऱयांनी प्रशासनातील अधिकाऱयांना अर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. हे अर्ज मिळाल्यानंतर नागरिक शांत झाले. या नागरिकांचे नेतृत्व माजी आमदार संजय कदम यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समितीचे सभापती किशोर देसाई, नगरसेवक खालिद रखांगे आदी उपस्थित होते.









