असोसिएशनकडून गाळय़ांचे हस्तांतर : मार्केट स्थलांतर झाल्याने कॅन्टोन्मेंटचा महसूल बुडाला
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकरी आणि व्यापाऱयांच्या सोयीसाठी किल्ला परिसरातील जागेत भाजी मार्केट सुरू करण्यात आले होते. सदर भाजी मार्केट गांधीनगर येथे स्थलांतर करण्यात आले. पण कॅन्टोन्मेंट भाजी मार्केटमधील गाळे कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करण्यात आले नव्हते. मात्र अलिकडेच सर्व दुकानांचे शटर हटवून दि. 31 मार्च रोजी भाजी मार्केटच्या गाळय़ांचे हस्तांतर कॅन्टोन्मेंटकडे करण्यात आले आहे.
तालुक्मयातील भाजीपाला कांदा मार्केट परिसरातील भाजीमंडईत विक्री करण्यात येत होता. पण याठिकाणी गर्दी वाढत चालल्याने भाजी मार्केट असोसिएशनची स्थापना करून भाजी मार्केट स्थलांतराचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजी मार्केट सुरू करण्यासाठी किल्ला खंदकालगत असलेल्या जागेत गाळे बांधून भाजी मार्केट सुरू करण्यासाठी कॅन्टोन्मेंटची जागा लीजवर घेण्यात आली होती. 1989 मध्ये कॅन्टोन्मेंटने येथील जागा कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट असोसिएशनला 5 वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली होती. त्यामुळे याठिकाणी 130 गाळे बांधण्यात आले होते. तसेच प्रत्येक गाळय़ाचे भाडे कॅन्टोन्मेंटला भरण्यात येत होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंटला उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला होता.
पण भाजी मार्केट असोसिएशनची लीज संपुष्टात आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत मंजुरी देऊन वेळोवेळी भाडेकराराची मुदत वाढवून दिली होती. तसेच भाडय़ाच्या रकमेत वाढ केली होती. पण भाडेवाढ करण्याच्या मुद्दय़ावर वाद झाल्याने गाळे रिकामी करण्याची नोटीस कॅन्टोन्मेंट बोर्डने कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट असोसिएशनला दिली होती. त्यामुळे असोसिएशनने न्यायालयात धाव घेऊन भाजी मार्केटचा ताबा घेण्यास स्थगिती घेतली होती. तसेच नवीन भाजी मार्केटचे काम पूर्ण झाल्यानंतर गाळे रिकामी करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. तीन वर्षांपूर्वी येथील भाजी मार्केट एपीएमसी मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. पण कॅन्टोन्मेंट भाजी मार्केटमधील गाळे कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करण्यात आले नव्हते. त्यामुळे गाळय़ांचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत सातत्याने तक्रार करण्यात येत होती. अखेर कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट असोसिएशनने गाळे हस्तांतर करण्याचा निर्णय घेऊन गाळय़ांचे शटर काढून घेतले. तसेच दि. 31 मार्च रोजी येथील 130 गाळे व जागा कॅन्टोन्मेंट बोर्डकडे हस्तांतर केले आहेत.
जागेच्या वापराबाबत लवकरच निर्णय
सध्या जागेचा वाद न्यायालयात असल्याने गाळे हस्तांतर केल्याचे पत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. भाजी मार्केटमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डला भाडे मिळत होते. तसेच पार्किंग शुल्कच्या माध्यमातून महसूल मिळत होता. पण भाजी मार्केट स्थलांतर झाल्याने कॅन्टोन्मेंटचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेऊन जागेचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









