चावडी – काणकोण येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे उद्गार
प्रतिनिधी/ काणकोण
जी व्यक्ती अमेठीतून विजयी होऊ शकत नाही, त्या व्यक्तीने गोव्यात येऊन येथील मतदारांना शहाणपणाचे बोल सांगणे अत्यंत हास्यास्पद आहे, अशी टीका केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी महिला यांनी चावडी-काणकोण येथे आयोजित सभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. महिलावर्ग ही भाजपाची शक्ती आहे. भाजपाने अत्यंत कठीण काळात जनतेला सावरले आहे. त्या पक्षावर विश्वास ठेवतानाच पक्षाच्या उमेदवारावर विश्वास ठेवा, असे आवाहन इराणी यांनी केले. मोजक्याच शब्दांत आपले मत व्यक्त करताना त्यांनी उपस्थित महिलांची मने जिंकली.
काणकोण मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार तवडकर यांच्या प्रचारार्थ चावडीवर आयोजित केलेल्या या जाहीर सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या सभेला उपस्थित असलेला महिलावर्ग पाहून भाजपाला एक प्रकारची शक्ती लाभली. या मतदारसंघातील पोळे ते गुळे आणि कुसके ते आगोंदपर्यंतचे कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. त्यात महिलांचा अधिक भरणा होता.
या जाहीर सभेचे निरीक्षण करण्ग्नयासाठी भाजपाचे संघटनमंत्री सतीश धोंड उपस्थित होते. व्यासपीठावर कल्याणचे आमदार गणपत गायकवाड, कर्नाटकातील माजी आमदार सुनील हेगडे, सर्वानंद भगत, माजी जिल्हा पंचायत सदस्या डॉ. पुष्पा अय्या, नगराध्यक्ष सायमन रिबेलो, उपनगराध्यक्ष अमिता पागी, नगरसेवक लक्ष्मण पागी, सारा देसाई, नारसिस्को फर्नांडिस, गंधेश मडगावकर, हेमंत गावकर, शाबा गावकर, दिवाकर पागी, माजी सरपंच दत्ता गावकर, माजी नगरसेवक किशोर शेट, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विंदा सतरकर, मनुजा ना. गावकर, चंदा देसाई, वल्लभ टेंगसे, पैंगीणचे माजी सरपंच तुळशीदास नाईक आणि अन्य कार्यकर्त्यांचा मावेश होता.
मंत्री असताना प्रत्येक खात्याला न्याय दिला
आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून प्रत्येक माणसाच्या विषयांचा विचार करणारा आहे. 1996 ते 2022 पर्यंतच्या गोव्यातील प्रत्येक आंदोलनात आणि चळवळीत आपला सहभाग राहिलेला आहे. मंत्री असताना प्रत्येक खात्याला आपण न्याय दिला. आदिवासी कल्याण खात्यातर्फे अनेक योजना चालीस लावल्या. कृषी खात्याला केंद्र सरकारचा कर्मण्ये पुरस्कार मिळवून दिला, याकडे तवडकर यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधले.
कार्यक्रमांची प्रसिद्धी कधी नाही केलाr
सत्तेवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विरोधकांचा सामना करावा लागतो. काणकोण मतदारसंघातील भूमिगत वीजवाहिन्या आणि 19 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना या दोन्ही योजना आपल्या असून त्याचा आपण बाऊ कधीच केला नाही आणि पंचायती व जिल्हा पंचायतीच्या छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमांची प्रसिद्धी कधी केली नाही. ग्रामीण भागात शहरातील मुले शिकायला येणे, या भागातील संस्कृती आणि ग्रामीण रोजगारांना चालना देणे ही आपली उद्दिष्टे असून आपल्या प्रचाराची धुरा युवकांनी शिरावर घेतली आहे. महिला व युवकांच्या विश्वासावर ही निवडणूक आपण मोठय़ा मताधिक्याने जिंकणार, असा विश्वास तवडकर यांनी यावेळी व्यक्त केला. संघटनशक्तीवर आपला पूर्ण भरवसा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार गायकवाड, नगराध्यक्ष रिबेलो, नगरसेवक रमाकांत ना. गावकर, लक्ष्मण पागी, माजी नगरसेवक दिवाकर पागी, माजी सरपंच शाबा गावकर, चंदा देसाई, दत्ता वेळीप, बारकेलो वेळीप यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सिद्धार्थ देसाई, प्रसाद पागी यांनी केले. विंदा सतरकर यांनी स्वागत केले. यावेळी भाजपाचा काणकोण मतदारसंघासाठीचा जाहीरनामा आमदार गायकवाड यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.









