केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मायकल लोबोंना आश्वासन : फडणवीस यांच्याकडून गोव्याच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर
प्रतिनिधी / पणजी
भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीचे गोव्यासाठीचे निरीक्षक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर केलेला आहे. राज्यातील भाजपची नेमकी परिस्थिती काय व कोणत्या उपाययोजना आखाव्या लागतील, याबाबतचाही अहवाल त्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही सादर केला आहे. अमित शहा यांच्या आदेशानंतर गोव्याचे कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांना तातडीने नवी दिल्लीत बोलावून घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी फडणवीस यांच्या उपस्थितीतच लोबो यांची शहा यांच्याशी भेट झाली. पक्षात मानाचे स्थान निश्चित मिळेल, पक्ष सोडण्याचा विचार मनातही आणू नका, असा सल्ला अमित शहा यांनी दिला आहे.
गेल्या आठवडय़ात गोव्यात तीन दिवशीय आपल्या दौऱयात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांबरोबर तसेच मंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठका घेतल्या व चर्चा केली. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबतचा आढावा त्यांनी यापूर्वीच घेतला होता. आमदारांना देखील मोकळेपणाने काम करण्यास मिळत नाही. मुख्यमंत्र्यांकडून सहकार्य मिळते, परंतु भलतीच माणसे अडचण निर्माण करीत असल्याच्या तक्रारी काही नेत्यांनी केल्या होत्या.
गोव्यात कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकल्याच पाहिजेत, असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आग्रह आहे. त्यामुळे भाजपमध्ये जे कोणी अस्वस्थ आहेत त्यांच्याशी ते स्वतः चर्चा करणार आहेत. फडणवीस यांची अमित शहा यांच्याबरोबर गेल्या आठवडय़ातील बैठकीत चर्चा झालीच होती. पुन्हा एकदा बुधवारी ते दिल्लीला गेले. जाताना त्यांनी मायकल लोबो यांनाही दिल्लीला बोलावून घेतले.
मायकल लोबो यांच्याबरोबर घेतलेल्या बैठकीत अमित शहा यांनी लोबो यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व समस्यांवर तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिलेच. शिवाय कोणत्याही परिस्थितीत वेगळा विचार करू नका, पक्षात तुम्हाला मानाचे स्थान प्राप्त होईल. भाजप हा लोकशाहीने जाणारा पक्ष आहे. त्यात सर्वांचे विचार लक्षात घेऊनच निर्णय होत असतात. तुम्ही एकदम निश्चिंत रहा, असेही त्यांना सांगितले.
भाजपचा पहिला सर्व्हे अहवाल अडचणीचा
दरम्यान, भाजपने पुण्यातील एका खासगी संस्थेला निवडणूक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या समितीने आपला अहवाल तयार करून तो पक्षाला सादर केलेला आहे. सदर अहवाल निराशा करणारा आहे. अर्थात हा पहिलाच अहवाल आहे. त्यानंतर राज्यात काँग्रेस पक्षात उभी फूट पडलेली आहे. त्यानंतर नव्या अहवालात कोणते बदल होतील कळत नाही. सध्या सर्वेक्षण करण्याचे काम चालू झाले आहे. हा दुसरा अहवाल नोव्हेंबरपर्यत सादर होणार आहे. 2012 मध्ये मगो भाजप युती व मनोहर पर्रीकर हे नेते होते. त्यामुळे पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते. 2017 च्या निवडणुकीत मगोबरोबर युती नव्हती व पक्षाला केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. आतादेखील पक्षाचे अनेक कार्यकर्ते मगोबरोबर युती करा अन्यथा निवडणूक जड जाईल, असे सांगत आहेत.









