प्रतिनिधी/ रत्नागिरी
कांदा निर्यातीबाबतचा निर्णय मागे घेऊन शेतकऱयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी केंद्रातील भाजपा सरकारविरोधात रत्नागिरीतही जिल्हा काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱयांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करण्यात आली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन बुधवारी दुपारी पार पडले. जगभरात लॉकडाऊन असताना मोठय़ा कष्टाने शेतकऱयाने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकऱयाला होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर करून शेतकऱयांवर घोर अन्याय केला आहे. 4 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती.
आता 3 महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱयांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा उत्पादन शेतकऱयांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱयांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले, आमदार हुस्नबानू खलिफे, अशोक जाधव, प्रांतिकच्या रुपाली सावंत, दीपक राऊत, कपिल नागवेकर यांच्यासह युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय, राष्ट्रीय दल, अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ..
सोनगावात अल्पवयीन युवतीवर अत्याचार, तरूणास अटक
एकटेपणाचा घेतला गैरफायदा, अल्पवयीन युवतीवरील अत्याचाराची आठवडय़ातील दुसरी घटना
प्रतिनिधी
खेड
घरात एकटी असल्याची संधी साधत 12 वर्षीय अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावातीलच रोशन रामचंद्र खेराडे (30, रा. सोनगाव-ब्राह्मणवाडी) या नराधमास येथील पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ही घटना 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. आठवडाभरातील अल्पवयीन युवतीवरील लैंगिक अत्याचाराची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
पिडित युवतीच्या घरातील माणसे कामावर गेल्यानंतर तिची आईही दवाखान्यात गेली होती. यानंतर युवती शेजारी गेली होती. याचदरम्यान, हा नराधम पिडित युवतीच्या घरात घुसून आतमध्ये लपून बसला होता. युवती घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.
पिडित युवतीचे पालक सायंकाळी घरी परतल्यानंतर घडलेला सारा प्रकार कथन करताच कुटुंबियांना एकच धक्का बसला. कुटुंबियांनी तातडीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानुसार लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आडुरकर यांनी तपास गतिमान करत बुधवारी पहाटेच्या सुमारास नराधमास अटक केली. नराधम हा विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती आहे.









