ऑनलाईन टीम / मुंबई :
देशभरात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केले. मोदींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मोदींच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेस बुधवारपासून राज्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर माफी मांगो आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले, पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते. त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्याने मनाला तीव्र दु:ख झाले आहे. पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत असून, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपने आणि पंतप्रधानांनी त्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा या वक्तव्याविरोधात काँग्रेस उद्यापासून ‘महाराष्ट्राची माफी मागावी’ असे फलक घेऊन भाजपच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर माफी मांगो आंदोलन करणार आहे.