बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीत कर्नाटक राज्याचा वाटा वाढला आहे. राज्यातील चार नेत्यांना संघटनेत जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये बेंगळूर दक्षिण येथील लोकसभा सदस्य तेजस्वी सूर्य यांना पक्षाच्या युवा संघटनेचे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी पूनम महाजन यांच्यावर ही जबाबदारी होती. याशिवाय कर्नाटकचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री सीटी रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक केली आहे. तसेच राज्यसभेचे सदस्य राजीव चंद्रशेखर यांना राष्ट्रीय प्रवक्ता केले आहे. तसेच बी. एल. संतोष पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून कायम असणार आहेत.
पहिल्यांदाच, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत कर्नाटकातील नेत्यांना इतके प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पहिले राज्य प्रभारी असलेले तेलंगणाचे मुरलीधर राव यांना फेरबदलात राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून हटविण्यात आले आहे. मंत्री रवी यांच्या आधी राज्याचे अनंत कुमार हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते पण त्यानंतर राज्यातील कोणत्याही नेत्याला संघटनेत राष्ट्रीय पातळीवरील कोणतेही मोठे पद नव्हते. राज्य संघटनेत सुरू असलेल्या संघर्षानंतर नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत राज्यातील नेत्यांना दिलेले स्थान समाधानकारक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संतोष यांच्या पुढाकाराने तेजस्वी आणि रवि या दोन तरुण नेत्यांना राज्यातून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे सूत्रांनी म्हंटले आहे.









