ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमत मिळाले आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटद्वारे नितीश कुमार यांना सावधानतेचा इशारा देत भाजपा-संघाची विचारधारा सोडून तेजस्वींना आशीर्वाद द्या, अशी ऑफर दिली आहे.
सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘भाजप आणि संघ अमरवेलीसारखी आहेत. ज्या झाडाला वेढतात ते झाड मात्र सुकून जाते आणि वेल वाढतच राहतो. नितीशजी, लालूजींनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले. भाजपा-संघाची विचारधारा सोडून तेजस्वींना आशीर्वाद द्या. अमरवेल रुपी भाजपा-संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका.’
सिंह यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नितीशजी, बिहार आपल्यासाठी आता छोटं आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात या. सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे एकमत करण्यासाठी मदत करा, इंग्रजांची रुजलेली नीती मोडीत काढा.’









