श्रीनगरमधील लाल चौक ते कारगिल असा प्रवास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने श्रीनगरमधील लाल चौक ते कारगिल अशी तिरंगा यात्रा विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. आज मंगळवारी विजय दिवस असून त्याच दिवशी ती कारगिल येथील युद्ध हुतात्मा स्मारकापर्यंत पोहचणार आहे. या यात्रेचा प्रारंभ लाल चौकात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हरित ध्वज दाखवून प्रारंभ केला.
सोमवारी ही यात्रा लाल चौकातून सुरु झाली. या यात्रेत 700 मोटारसायकल स्वार समाविष्ट आहेत. ते देशाच्या विविध भागांमधून आले आहेत. लाल चौकातून अशी तिरंगा यात्रा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. 1999 मध्ये भारतीय सेनेने कारगिल युद्धात पाकिस्तानला पुरते नमविले होते. 26 जुलैला पाकिस्तानने त्याचा पराभव मान्य केला होता. त्यामुळे हा दिवस प्रत्येक वर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून ही यात्रा कारगिल येथे पोहचणार असून युद्ध स्मारकापाशी तिची सांगता होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त
हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे आहे. यानिमित्त भाजप आणि केंद्र सरकारच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत रात्रंदिवस आपल्या घरांवर किंवा सार्वजनिक स्थानी तिरंगा ध्वज फडकवित ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर ही यात्रा महत्वाची मानली जात आहे.
देशभक्तीच्या भावनेसाठी
देशातील तरुणांमध्ये एकात्मता रुजावी, तसेच देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय कार्यक्रमांच्sा आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरला विषेश दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद 370 अनुच्छेद 35 अ निष्प्रभ केल्यानंतर अशा यात्रेचे आयोजन करण्यात आल्याने ही यात्रा औत्सुक्याचा विषय बनली आहे.









