वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी, बांदा, आंब्रड या तीन ठिकाणी भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल मंगळवार 7 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी गांधी-चौक येथे भव्य विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी नगराध्यक्षपदी संजू परब, बांदा सरपंचपदी अक्रम खान तर आंब्रड जि. प. सदस्य म्हणून लॉरेन्स मान्येकर निवडून आले. भाजपने अमर, अकबर, ऍन्थोनी हा फॉर्म्युला यशस्वी केला. त्यामुळे भाजपचा भव्य विजयी मेळावा सावंतवाडीत गांधी चौक येथे 7 जानेवारीला घेण्याचे निश्चित केले आहे. या विजयी मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे आदी उपस्थित राहणार आहेत. सर्व भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष महेश सारंग, पुखराज पुरोहित, माजी आमदार राजन तेली, मनोज नाईक यांनी केले.
शिवसेनेकडून सिंधुदुर्गवर अन्याय!
जठार म्हणाले, शिवसेना-भाजपच्या राज्यात सिंधुदुर्गला गृह व वित्तमंत्रीपद दिले गेले. पण आता शिवसेना महाआघाडीची सत्ता येताच शिवसेनेने सिंधुदुर्गातील दोन आमदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबईच्या आमदाराला पालकमंत्रीपद देऊन स्थानिक आमदारांना डावलले गेले. भाजप याचा बदल घेणार आहे. यापुढे शतप्रतिशत निवडणूक लढवून कोकणला आमदार, मंत्रीपद आणि हक्काचा पालकमंत्री दिला जाईल.









