बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक भाजपमधील अंतर्गत कलह वारंवार चव्हाट्यावर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून नेतृत्व बदलाच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्र्यांवर नाराज असणाऱ्या काही नेत्यांनी नेतृत्व बदलाविषयी हाय कमांडपर्यंत बोलणी केली आहे. परंतु अद्याप राज्यात नेतृत्व बदल झालेला नाही. दरम्यान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी, जोपर्यंत पार्टी हाय कमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे म्हंटले आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात मंत्री आणि आमदारांकडून वारंवार तक्रारी केल्याच्या माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. “मी अशा प्रकारच्या तक्रारींवर प्रतिक्रिया देणार नाही. जोपर्यंत हाय कमांडने माझ्यावर विश्वास ठेवला आहे तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदी कायम असणार आहे. ज्या दिवशी ते मला पद सोडायला सांगतील, त्यादिवशी मी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करणार ,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आपण पक्ष आणि सरकारमधील घडामोडींबाबत कोणत्याही वाच्यता करणार नाही. “पक्षनेतृत्वाने मला संधी दिली आहे, ज्याचा मी चांगला उपयोग करीत आहे. उर्वरित हायकमांड आहे,” असे येडियुरप्पा म्हणाले. नाराज आमदारांच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याच्या वक्तव्यावर त्यांचे हे विधान आहे. राज्य सरकारच्या नेतृत्वाविरोधात तक्रारी घेऊन काही नेते अलीकडेच दिल्लीला गेले होते.
येडियुरप्पा यांनीही राज्यात ‘पर्यायी नेतृत्व नसल्याची’ चर्चा उडवून दिली. “असे कोणतेही पर्यायी नेते नसल्याचा दावा करण्यास मी सहमत नाही,” असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले, “राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर पर्यायी नेते असतात, ” त्यामुळे मी याविषयी काहीही बोलणार नाही असे मुख्यंमत्री म्हणाले.









