प्रतिनिधी/ पणजी
भारतीय जनता पक्षाने गोव्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. ते आता लवकरच अधूनमधून गोव्यात येऊन भाजपची निवडणूक रणनीती ठरवून एकंदरीत तयारी करणार आहेत. गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होऊन निर्विवाद बहुमत मिळेल, असा आत्मविश्वास त्यांनी वर्तविला आहे.
फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुढे सांगितले की, महाराष्ट्र राज्य नेहमीच गोवा राज्याच्या पाठीशी राहिलेले असून महाराष्ट्र प्रदेश भाजपने गोवा भाजपला नेहमीच सहकार्य देऊन सर्व प्रकारची मदत केलेली आहे. गोव्यातील सावंत सरकारने राज्यात चांगली कामगिरी केली असून त्याच्या जोरावर गोमंतकीय जतना भाजपलाच पुन्हा विजयी करेल.
गोव्याच्या निरीक्षकपदी नेमणूक केल्यानंतर फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची उणीव नेहमीच जाणवणार आहे. ते नसले तरी त्यांनी भाजपला दिलेली दिशा व गोवा राज्यात उभे केलेले संघटन हे भाजपसाठी प्रेरणादायी आहे. गोव्यातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे. त्याच्या आधारावर भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी मारेल, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपचे नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी गोव्यात येऊन पक्षासाठी काम करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.









