काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची केंद्र सरकारवर सडकून टीका
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्रातील भाजपचे मनुवादी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी ओबीसींना संपवण्याचा घाट घातल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्राने इंम्पिरिकल डाटा न दिल्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले. संविधानाला हात न लावता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली पारंपरिक व्यवस्था केंद्र सरकार संपवण्याचे काम करत आहे. निवडणुका आल्यानंतर जातीयवाद निर्माण करून ओबीसींची दिशाभूल करुन निवडणुका जिंकण्याचा नवा फंडा भाजपकडून सुरू असल्याची घणाघाती टीका पटोले यांनी जाहीर मेळाव्यात केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ओबीसी विभागाच्यावतीने राज्यस्तरावर ओबीसींचे प्रश्न घेऊन शुक्रवारी रत्नागिरीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान येथील काँग्रेसभवन येथे पार पडलेल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढवला. याप्रसंगी व्यासपीठावर दुग्ध व्यवसाय तथा क्रीडामंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, ऍड. पल्लवी रेणके, ओबीसी सेल उपाध्यक्ष दीपक राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘सुनेचे’ दिवस संपतीलः पटोले
केंद्र सरकारकडून ओबीसींवर केल्या जाणाऱया अन्यायाचा पाढा नाना पटोले यांनी या मेळाव्यात वाचला. केंद्राने इंम्पीरीकल डाटा न दिल्यामुळे न्यायालयात ओबीसी आरक्षण न टिकल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आगामी निवडणुकीत केंद्रातील या मनुवादी भाजप सरकारला हद्दपार केले जाईलच. मात्र आता फार काळ वाट पहावी लागणार नाही. संविधान सुरक्षित ठेवण्याचे काम येत्या 2024 पासून होणार आहे. ही लढाई मोठय़ा प्रमाणात गतिमान करण्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ‘सुनेचे’ दिवस संपतील, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेत मागास प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याची केलेली संपूर्ण व्यवस्थाच संपवण्याचे काम केंद्रातील भाजप व्यवस्थेने केल्याचो पटोले म्हणाले. काँग्रेसच्या ओबीसी सेलने सर्व ओबीसींना एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंम्पिरिकल डाटा तयार केला होता. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी ओबीसींना संपवण्याचा घाट घातला आहे. ओबीसींच्या आरक्षणाची व्यवस्था संपली तर पुन्हा माणसाला माणसारखं जगणे संपेल.
केंद्रातील भाजप सरकारने ईडीचा वापर केवळ त्रास देण्यासाठी सुरू केला आहे. कोकणातही मनुवादी व्यवस्थेचे मोठे जाळे आहे. येथें या व्यवस्थेकडून ओबीसींना पायाखाली चेपण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मावळय़ांचे राज्य आणण्याच्या या लढाईत मोठय़ा ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. या मेळाव्याप्रसंगी तालुकाध्यक्ष विकास पाटील, दीपक राऊत, अशोक जाधव, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, शहर अध्यक्ष राकेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
‘हिजाब’ नव्हे 2024 च्या निवडणुकीत जनताच ‘हिशोब’ मागणार
‘हिजाब’चा प्रश्न पाकिस्तानने निर्माण केल्याचा शोध भाजपाने लावल्याची टीका पटोले यांनी केली आहे. कोणी कोणते कपडे घालायचे, हे भाजप सरकारच ठरवायला लागले. आता हिजाब मुद्दा नव्हे तर हिशोब द्यायचा मुद्दा झालाय. पण 2024 च्या हिशोब द्या, हे जनताच भाजपाला सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्र्यांनी देश विकायला काढलाः पटोले
‘छप्पन इंच सिना’ असल्याचे सांगणारे प्रधानमंत्रीच आज देश विकत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 23 सार्वजनिक उपक्रम विकून टाकले असून संरक्षण खात्याची 65 हेक्टर जमीन विकण्याचा घाट घातल्याचा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला.
संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची तत्काळ चौकशी करा!
राज्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा हक्क आहे. त्यानुसार काँग्रेस आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. बांद्यापासून चांद्यापर्यंत काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न यापुढील काळात केला जाईल. सध्या महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पेलेल्या आरोपांची चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करा, अशी प्रमुख मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.









