नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्याविषयीही विविध चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. अशातच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. भाजप नेत्या रिता बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट यांच्याशी बोलणं झाल्याचा दावा केला होता. मात्र आता या चर्चेवर खुद्द सचिन पायलट यांनी भाष्य केले आहे.
याबाबत सचिन पायलट यांनी सांगितले की, भाजपमधील कोणासोबतही माझं बोलणं झालं नाही. रिता बहुगुणा जोशी यांनीही मला फोन केलेला नाही. त्या सचिनशी फोनवर बोलल्या आहेत. मग तो सचिन तेंडुलकर असावा. माझ्याशी बोलण्याची त्यांची हिंमत नाही असा पलटवार त्यांनी केला आहे.
भाजप नेत्या रिता बहुगुणा जोशी नेमके काय म्हणाल्या होत्या ?
उत्तर प्रदेशातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या रीता बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये येतील असा दावा केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, पायलट हे लवकरच भाजपमध्ये येतील. माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. उत्तर भारतामध्ये काँग्रेस पक्ष आता जवळपास संपला आहे. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात आलेली नाहीत, असे त्यांनी सांगितले होते.
गेहलोत व पायलट यांना एकाचवेळी खूश ठेवणे पक्षासाठी कठीण जाऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. भाजपने पायलट यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यावेळी गेहलोत यांच्यासह काही नेत्यांनी केला होता.









