निवडणूक आयोगाकडून प्रचारबंदी- अधिकारी यांना इशारा- घोष यांना नोटीस
पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान हिंसाचार आणि वादग्रस्त विधाने समोर येत आहेत. याचदरम्यान निवडणूक आयोगाने आता भाजप नेते राहुल सिन्हा यांच्यावरही 48 तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे. सिन्हा यांच्यावर सशस्त्र दलांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करण्याचा आरोप आहे. राहुल सिन्हा आता पुढील 48 तासांपर्यंत प्रचार करू शकणार नाहीत.
याचबरोबर निवडणूक आयोगाने भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांना इशारा दिला तर दिलीप घोष यांना नोटीस बजावली आहे. अधिकारी यांच्यावर 29 मार्च रोजी आक्षेपार्ह भाषण करण्याचा आरोप आहे. त्यांनी यासंबंधी 9 एप्रिल रोजी निवडणूक आयोगासमोर भूमिका मांडली आहे.
तर भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना आयोगाने बुधवार सकाळी 10 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. आयोगाने कूचबिहार येथील हिंसाचारावर केलेल्या विधानाप्रकरणी स्पष्टीकरण मागविले आहे.
सीतालकूचीमध्ये 4 नव्हे तर 8 जणांना मारायला हवे होते. केंद्रीय दलांनी केवळ 4 जणांना का मारले म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी असे भाजप नेते राहुल सिन्हा यांनी एका सभेदरम्यान म्हटले होते.