मडगाव नगराध्यक्ष निवडणूक
प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवाराची आज निवड होणार असल्याचे संकेत मिळत असून सर्व 15 नगरसेवकांची आज रविवारी नानुटेल हॉटेलमध्ये बैठक बोलाविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा मागील खेपेला 15 सदस्यांचे बहुमत असताना क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाला होता आणि गोवा फॉरवर्डचे समर्थन लाभलेल्या घनश्याम शिरोडकर यांनी 15 विरुद्ध 10 अशी बाजी मारली होती. त्यानंतर लगेच अविश्वास ठराव आणून भाजप गटाने घनश्याम शिरोडकर यांची उचलबांगडी केली होती.

पुन्हा नव्याने नगराध्यक्ष निवडणुकीसाठी गुप्त मतदान झाल्यास क्रॉस वोटिंग होण्याची शक्मयता फेटाळली जाऊ शकत नसल्याने अध्यादेश आणून सरकारने हात उंचावून मतदान घेण्याची पद्धती लागू केली आहे. यावरून विरोधक सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लोकशाहीची हत्या केल्याची टीका सरकारवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार ठरविण्यासाठी भाजप नगरसेवकांची बैठक होत असून आमदार दिगंबर कामत यांच्याकडून त्यांच्या गटातील दामोदर शिरोडकर यांचे नाव पुढे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, मूळ भाजपा गटातील ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक यांनी आपणही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केल्याने भाजप नेते कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार कामत यांनी पक्षाचे नेते भाजप उमेदवार निश्चित करतील, असे याआधी जाहीर केले होते.
दुसरीकडे, विरोधी गोवा फॉरवर्ड गटाकडे संख्याबळ नसल्याने तसेच गुप्त मतदान होणार नसल्याने त्यांच्याकडून उमेदवार उभा केला जाण्याची शक्मयता नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदर चित्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट होणार आहे.









