नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा काही दिवसांपूर्वी बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्या गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर काँग्रेस नेत्यांकडूनही जोरदार टीका केली जात आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आजारी असल्याचं कारण देत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टासमोर हजर न राहण्याची सवलतीची विनंती कोर्टासमोर केली होती. त्यानंतर त्यांना कधी बास्केटबॉल खेळताना तर कधी नाचताना पाहून नेटकऱी मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत.
भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना आम्ही बास्केटबॉल खेळताना पाहिलं. त्यांना कोणताही आधार न घेता चालताना पाहिलं आणि आम्हाला खूप बरं वाटलं. आतापर्यंत आम्ही त्यांना फक्त व्हिलचेअरवर पाहत होतो. पण बास्केटबॉल खेळताना पाहिलं तर खूप आनंद झाला. त्यांना झालेल्या दुखापतीमुळे त्या चालू किंवा फिरू शकणार नाहीत असं सांगण्यात येत होतं. ईश्वर त्यांना नेहमी स्वस्थ ठेवो, असं खोचक ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
नुकताच प्रज्ञा ठाकूर यांचा एका विवाहसोहळ्याच्या निमित्तानं डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या भोपाळ येथील निवासस्थानावरच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रज्ञा ठाकूर यांनी दोन गरीब मुलींचा विवाह स्वत:च्या राहत्या घरी आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रज्ञा ठाकूर गाण्याच्या तालावर नाचताना पाहायला मिळत आहेत.









