नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या दिल्लीतील गोमतीपूर येथील निवासस्थानी बुधवारी आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याप्रकरणी तपास सुरू असून लवकरच सत्य समजण्याची शक्यता आहे.
त्यांच्या मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे. पक्षासाठी व स्वतः माझ्यासाठीही हा क्लेषदायक घटना आहे. ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या असून शर्मा यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शर्मा यांच्या निधानाच्या घटनेवर दुःख व्यक्त केले असून इतर अनेक संसद सदस्य आणि शर्मांच्या मित्रमंडळींनी त्यांच्या मृत्यूवर शोक प्रगट केला.
राम स्वरूप शर्मा हे मंडी मतदारसंघातून 2014 आणि 2019 अशा दोन लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासू सहकार्यापैकी एक होते. परराष्ट्र व्यवहार विभागाच्या स्थायी समितीचे ते सदस्य होते. लोकसभेत त्यांची कामगिरी प्रेरणादायक होती, असे सांगण्यात आले.









