गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन मांद्रेकर यांचे प्रतिपादन : गोमंतक मराठा समाजातर्फे भाऊसाहेब बांदोडकरांची पुण्यतिथी साजरी
वार्ताहर / पणजी
भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षणगंगा गोव्यात आणून लोकांना त्यांच्या विकासाचा मार्ग दाखविला. त्यांनी राजकारणी म्हणून कधीच सूडाचे राजकारण केले नाही, कधीच स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही, पाहिला तो केवळ परोपकार, असे प्रतिपादन म्हापसा येथील गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी केले.
गोमंतक मराठा समाज गोवा संस्था आणि भाऊसाहेब बांदोडकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या कै. राजाराम पैंगिणकर स्मृती सभागृहात गोव्याचे भाग्यविधाते, पहिले मुख्यमंत्री तथा गो. म. समाजाचे भूषण स्व. दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सन्मानिय पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळॅ गोवा विद्यापीठाचे इतिहास विभागातील सहाय्यक प्रा. पराग पोरोब, स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नातू गिरीराज वेंगुर्लेकर, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ प्रा. सुभाष वेलिंगकर, संस्थेचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, सत्कार मूर्ती डॉ. रामकृष्ण मोरजकर, सचिव मंगेश कुंडईकर, खजिनदार श्रीकृष्ण आसगावकर, कार्यकारी सदस्य लक्ष्मीकांत नाईक, जितेंद्र शिरगावकर, विनोद जांबावलीकर, सुनील पिळगावकर, सुनील फातर्पेकर, सतीश पैंगिणकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलन करून स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या तैलचित्रास पुष्पांजली वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपीठावरून बोलताना प्रमुख वक्ते प्रा. पराग पोरोब म्हणाले की, राजकीय इच्छाशक्तीतून उत्कृष्ट शासन देणाऱया भाऊसाहेब बांदोडकर यांनी जमीन सुधारणा कायदा आणि शिक्षणासाठी त्यांनी केलेली सर्वाधिक गुंतवणूक हे उल्लेखनीय कार्य आहे. भाऊंनी राजकारणाचा उपयोग संपत्ती उभारण्यासाठी केला नाही. उलट आपल्या वैयक्तिक आर्थिक संपत्तीतून समाजासाठी उपयोग केला आहे. आजचे राजकारणी जनतेच्या पैशातून संपत्ती मिळविण्यासाठी राजकारणात उतरत आहेत. भाऊंनी आपल्या स्वार्थासाठी कधीच राजकारण केले नाही म्हणूनच भाऊ जनतेच्या मनात आजही आहेत.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले की, भाऊंनी मनापासून शुद्ध राजकारण केले. काही माणसे असतात की, ते समाज मोठा करतात. त्यापैकी आपले भाऊ होते. त्यांच्या सारखे चारित्र्याचे राजकारणी अवघेच बघितले आहेत. त्यांचा कर्तुत्वाने समाज, राज्य आणि देश गौरवित झाला आहे. प्रथम समज भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. रामकृष्ण मोरजकर यांनी सुद्धा फक्त डॉक्टरकी न करता मोठे समाज कार्य केले आहे. शिरोडा येथील डॉ. सखाराम गुडे, डॉ. प्राणाचार्य दादावैध यांनी डॉक्टरकी पेशाबरोबरच शैक्षणिक व इतर क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. अशा तपस्वी नावामध्ये डॉ. मोरजकर यांचे नाव घ्यावे लागेल. गो. मे. समाजाला वैभव देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ते आज समाजाचे मुकूटमणी ठरले आहेत.









