ऑनलाईन टीम/तरुण भारत
कर्नाटकात एका महाविद्यालयातून हिजाब घालण्यावरुन सुरु झालेला गोंधळ संपूर्ण राज्यात पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात भगवा ध्वज फडकवला होता. त्यावरभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात भगवा ध्वज कधीतरी राष्ट्रध्वज बनू शकतो. मात्र, तिरंगा हा आता राष्ट्रध्वज असून, त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असा दावा त्यांनी बुधवारी केला.
हिजाब घालण्यावरून कर्नाटकात गोंधळ सुरु आहे. महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. यांनतर शिमोगा येथील एका महाविद्यालयात एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज फडकावतानाचा व्हिडिओ समोर आला होता. विद्यार्थ्याने राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावला होता. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी वर भगवा झेंडा फडकावत होता, तर बाकीचे विद्यार्थी खाली जल्लोष करताना दिसत होते.