वाढत्या तापमानामुळे घटतेय देशाची उत्पादकता
अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने हवामान बदलाशी संबंधित एका नव्या अध्ययनाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले ओत. वर्षाला एक अंशाने तापमान वाढल्यास भारतासारख्या देशांच्या निर्मिती क्षेत्रात दोन टक्क्यांपर्यंत उत्पादकता घटते. अशा स्थितीत भविष्यात या देशांच्या लोकांना ‘हीट टॅक्स’ सारख्या एखाद्या कराची भरणाही करावी लागू शकते असे यात म्हटले गेले आहे.
पिकांच्या वाढीवर अधिक तापमानाचा विपरित प्रभाव यापूर्वीच स्पष्ट झाला आहे. वाढते तापमान श्रम उत्पादकतेला कमी करून अन्य क्षेत्रांमधील महसुलालाही नुकसान पोहोचवित असल्याचे आता नव्या अध्ययनातून समजल्याचे उद्गार युनिव्हर्सिटीच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टीटय़ूटमध्ये दक्षिण आशिया संचालक डॉ. अनंत सुदर्शन यांनी काढले आहेत.

भारताला स्वस्त मनुष्यबळाचा वापर करून निर्मिती क्षेत्रात महासत्ता व्हायचे असल्यास त्याला या दिशेने अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. कामगारांना उष्ण तापमानापासून वाचविण्यासाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. तर हीट टॅक्स सारखी पावले उचलली गेल्यास यामुळे निर्मिती क्षेत्राच्या प्रतिस्पर्धेला धक्का पोहोचू शकतो. गरीब कामगारांच्या वेतनावरही याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो असे सुदर्शन यांनी म्हटले आहे.
डॉ. सुदर्शन या अध्ययनाचे मुख्य लेखक आहेत. भारतीय सांख्यिकी संस्थेचे ई. सोमनाथन, दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या रोहिणी सोमनाथन आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरालिनाच्या मीन तिवारी सह-लेखिका आहेत.









