180 किलोमीटर प्रतितास होता वेग
एका रशियान इन्फ्लुएंसरने रस्त्यावर कारसोबत असे अफाट कृत्य दाखविले की लोकांनी तोंडात बोटं घातली आहेत. पण त्याच्या या कृत्याने त्याला अडचणीत देखील आणले आहे. रस्त्यावर कारमधून धोकादायक स्टंट करण्याचा व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी त्याच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे.
रशियन इन्फ्लुएंसर डेनिल मायसनिकोव्हचा भरधाव कारमधील धोकादायक स्टंटचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावर सुमारे 180 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणाऱया कारमध्ये डेनिल बसला नव्हता. तो भरधाव कारच्याबाहेर झोपला होता आणि याकरता त्याने टेप आणि दोरखंडाची मदत घेतली होती. टेपच्या मदतीने त्याने स्वतःच्या पूर्ण शरीराला कारच्या बाहेरील हिस्स्याशी बांधले होते.

कार वेगाने धाव असताना डेनिल कारबाहेर झोपला होता. या कृत्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर डेनिलचे सुमारे 8 लाख फॉलोअर्स आहेत. व्हिडिओ अपलोड केल्यापासून आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडिओमध्ये डेनिल कशाप्रकारे कारशी स्वतःला टेपच्या मदतीने बांधत असल्याचे दिसून येते.
वाहतूक सुरक्षा अधिकाऱयांना या व्हिडिओविषयी समजल्यावर त्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. व्हिडिओत डेनिल पिवळय़ा रंगाच्या शेव्हरले कॅमेरो कारबाहेर दोरखंड आणि टेपने बांधला गेल्याचे दिसून येते.









