युक्रेनच्या अध्यक्षांचा भावुक संदेश : ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळय़ाला केले संबोधित
ग्रॅमी अवॉर्ड्स 2022 सोहळय़ादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांचा एक व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. झेलेंस्की यांनी युक्रेनियन नागरिकांवर होत असलेल्या जुलुमासाठी रशियाच्या नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. लास व्हेगासच्या एमजीएम ग्रँड गार्डन एरिनामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.30 वाजता हा सोहळा सुरू झाला.
आमचे म्युझिशियन्स टक्सीडो (एकप्रकारचा सूट) ऐवजी बॉडी आर्मर (सैनिकांचा पोशाख) परिधान करत आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल जखमींसाठी गाणी गात आहेत. कधीच ऐकू न शकणाऱया लोकांसाठी देखील ते गाणे गात आहेत. संगीताच्या विरुद्ध उद्ध्वस्त शहरांमधील भयाण शांतता आणि मारले गेलेले लोक आहेत. आम्ही प्रेमाचा वर्षाव, स्वतःचा आवाज मांडण्यासाठी आणि जगण्यासाठी स्वतःच्या स्वातंत्र्याचे रक्षण करत आहोत असे झेलेंस्की म्हणाले.
आम्हाला पाठिंबा द्या
आम्ही आमच्या भूमीवर रशियाशी लढत आहोत. रशिया स्वतःच्या बॉम्बद्वारे एक भयानक अन् मृत्यूला कवटाळून असलेली शांतता आणत आहे. या शांततेला तुम्ही संगीताद्वारे दूर करा, आमची कहाणी सांगा, स्वतःच्या सोशल नेटवर्कद्वारे किंवा टीव्ही नेटवर्कद्वारे तुम्ही युद्धाचे सत्य सांगा. तुम्ही कुठल्याही मार्गाने आम्हाला पाठिंबा द्या, परंतु गप्प बसू नका, तरच खरी शांतता प्रस्थापित होईल. युद्धाने आमची सर्व शहरे उद्ध्वस्त झाली असल्याचे झेलेंस्की यांनी ग्रॅमी सोहळय़ातील उपस्थितांना उद्देशून म्हटले आहे.









