प्रतिनिधी/ बेळगाव
भजनामुळे आध्यात्मिक आनंद तर मिळतोच परंतु प्रपंचातील ताप, ताण यांचाही विसर पडतो. अनगोळचे भक्ती भजनी मंडळ 50 वर्षे कार्यरत आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. कारण मंडळ कार्यरत ठेवण्यासाठी या मंडळाच्या महिलांमध्ये तळमळ व नि÷ा हे गुण आहेत, असे मत माधवी नरगुंदकर यांनी व्यक्त केले.
भक्ती भजनी मंडळाचा सुवर्णमहोत्सव बुधवारी सुधा जोशी यांच्या ‘आमोद’ या निवासस्थानी झाला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माधवीताई बोलत होत्या. व्यासपीठावर रोहिणी गणपुले व यशवंत बोंदे होते.
माधवीताई म्हणाल्या, सासुबाई शांत नरगुंदकर यांनी मला भजनाची गोडी लावली. त्या महिला मंडळांना भजन शिकवत. पुढे हैद्राबाद येथे मी भजनी मंडळ सुरू केले. सासुबाईंनी भजनाची परंपरा सुरू ठेवशील अशी शपथ घातल्याने मी वचनबद्ध होते. त्यांच्या पूर्व पुण्याईने मी आजही भजनाचा सराव व शिकवणी सुरू ठेवली आहे.
रोहिणी गणपुले यांनी 50 वर्षे कार्यरत राहिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सध्याच्या गुरु प्रतिभा आपटे यांनी पं. कडलास्कर बुवा व विठ्ठल रखुमाई व पं. कडलास्कार बुवा यांच्या प्रतिमांना मालार्पण केले. विजया दिक्षित व भारती मराठे यांनी माधवीताईंंचा सत्कार केला. प्रभा मुळगुंद व निर्मला साठे यांनी रोहिणी गणपुले यांचा तर सुधा जोशी व प्रतिभा आपटे यांनी बोंदे यांचा सत्कार केला.
गीता कुलकर्णी यांनी कविता सादर करून मंडळामुळे आपले दु:ख हलके झाले, असे सांगितले. भारती मराठे यांनी मंडळाने अमृत व सुवर्ण महोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रतिभा आपटे यांनी कडलास्कर मास्तरांनी आम्हाला उदंड शिकवले. त्यांच्यामुळे आम्ही भजन शिकलो, असे सांगितले. सुधा जोशी यांनी प्रास्ताविक केले. उज्ज्वला काकडे यांनी सूत्रसंचालन केले. निर्मला साठय़े यांनी आभार मानले. दुसऱया सत्रात भक्ती गीतांजली, भावांजली, गुरुकृपा या भजनी मंडळांचे तसेच पद्मजा बापट व भगिनी यांचे भजन झाले. पसायदानाने सांगता करण्यात आली.









