प्रतिनिधी /पणजी
कुडतरीचे काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका करणाऱया आलेक्स रेजिनाल्ड यांनी भगव्या रंगाचा शर्ट परिधान करून सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘महालक्ष्मी’ गाठले आणि त्यातून एकच धम्माल उडाली.
मुख्यमंत्र्यांना असंख्य बैठका होत्या. त्यातच उपसभापती इजिदोर फर्नांडिस हे टॅक्सी वाल्यांचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटील आलेले. रेजिनाल्ड हे भगव्या शर्टमध्ये पाहून तेही आवाक झाले. आश्चर्याची व योगायोगाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव आत्माराम बर्वे हे देखील भगव्या शर्टमध्येच होते. बर्वे यांनी आलेक्स रेजिनाल्ड यांना बरोबर बोलाविले व त्यांच्याबरोबरचा एक फोटो गम्मत म्हणून काढला. त्यानंतर त्यांनी तो फेसबुकवर टाकला. त्यातून शीघ्रगतीने प्रतिक्रिया सुरू झाल्या. आलेक्स रेजिनाल्ड कधी भाजपमध्ये जाताय ? असे प्रश्नही काही जणांनी उपस्थित केले.
एका फोटोने अशावेळी धुमाकूळ घातला की त्याचवेळी रेजिनाल्ड यांची अ. भा. काँग्रेस समितीने पक्षाच्या प्रचार समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती केली.









