अध्याय सोळावा
उद्धव भगवंतांना म्हणाला, तुझे जे स्वतःसिद्ध व सर्वव्यापक स्वरूप आहे, त्याची कल्पनाही सामान्य माणसाला करता येत नाही. कारण तो सदासर्वदा विषयातच भुललेला असतो. अशा अज्ञानी लोकांनाही स्वतःचा उद्धार करून घेता यावा म्हणून अनेक प्रकारची शास्त्रे न धुंडाळता व ध्यानधारणेच्याही भरीस न पडता केवळ ज्यांचं भजन केलं असता ते तरून जातील, अशा प्रकारच्या ज्या तुझ्या उत्तमोत्तम विभूती असतील त्या मला सांग. देह हाच मी अशा भ्रमामुळे सर्व प्राणी तुला पहात नाहीत. देहभ्रमाला मूळ कारण तुझी माया आहे, पण त्यातच तुझी कृपा झाली तर ती माया लयास जाते एवढी तुझ्या कृपेची थोरवी आहे. म्हणून हे गोविंदा ! तुझी कृपा प्राप्त होण्यासाठी तुझ्या विभूतींची उपासना केली पाहिजे. म्हणूनच तुझ्या विभूतींची समग्र स्वरूपे मला सांगावीत, उद्धवाची विनंती ऐकून श्रीकृष्ण फार संतुष्ट झाले आणि उद्धवाला उद्देशून म्हणाले, पूर्वी जेव्हा दुर्योधनाने माझा तिरस्कार करून घनघोर युद्धाला सुरुवात केली, तेव्हा अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता. अर्जुनाने कुरुक्षेत्रामध्ये प्राणघातक अशा युद्धात आपल्याच लोकांचा वध होणार याचे अतिशय भय धरून त्या वेळी त्यानं युद्धातून माघार घ्यायचा विचार केला, तेव्हा मी रणभूमीवर अनेक युक्त्या सांगून त्या वीराग्रणी अर्जुनाची समजूत घातली होती त्यावेळच्या चर्चेबद्दल थोडे सांगतो. लौकिक धर्मप्रवृत्तीवरून ‘मी मारणारा आणि हे मरणारे’ अशी महामोहाची भ्रांति अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झाली. तो म्हणाला, राज्यसुखाचीच हाव धरून त्यासाठी ज्ञातिबांधवांच्या वधाचे निंद्य कर्म करणे, हा मला निखालस अधर्म वाटतो. यात स्वधर्म बुडेल.
दररोज ज्यांच्या पायांचे तीर्थ घ्यावे, ज्यांना उच्चासनावर बसवून त्यांची पूजा करावी, त्यांना तीक्ष्ण बाणांनी जखमी करून त्या आप्तजनांच्या रक्ताने लिडबिडलेल्या पृथ्वीचा उपभोग घ्यावा हे माझ्याने करवत नाही. तू म्हणतोयस ह्या युद्धामध्ये मेलो असता स्वर्गात जाईन आणि विजयी झालो तर राज्य प्राप्त होईल. पण श्रीकृष्णा ! ती दोन्ही नश्वरच आहेत. मग मी कोणत्या हितासाठी युद्ध करावे ? असे विचारून सखेद वृत्तीने धनुष्यबाण टाकून देऊन शोकाकुल अर्जुन त्या समरांगणामध्ये म्लान वदन करून बसला. त्या वेळेस त्या महान् वीरसिंहाचे नानाप्रकारच्या युक्तींनी मीच समाधान केले. त्याची हकीकत ऐक. मी म्हणालो, अर्जुना ! देह नश्वर आहे. त्याला पाहिजे तितके उपचार केले असताही तो मरणाधीन असून क्षणिक आहे आणि जीव आहे तो स्वतःसिद्ध नित्य असून निर्मल आहे. त्याला जन्म नाही, त्याला नाश नाही, तो अचळ, अच्छेद्य, अमेय व निर्मल आहे. अर्जुना ! देह तुझ्या प्रयत्नाने वाचावयाचा नाही आणि जीव तू मारून काही मरावयाचा नाही. त्याच्या हत्येचे पातक लागेल असे जे तू समजतोस, ते केवळ अहंभावनेने होय. या सर्वांना जर तूच निर्माण केलेले असतेस तर तुझ्याने ते मारले गेले असते. पण तसा प्रकार नाही. याकरिता मी यांना मारणार असे म्हणण्यात तू अभिमानात गुरफटल्याचे मात्र दिसून येते. देहाचा जो निर्माणकर्ता असतो, तोच त्याचा संहार करणारा असतो. तूं निर्माणकर्ताही नव्हेस आणि मारणाराही नव्हेस मग व्यर्थ अहंता कशाला भोगतोस? ही अहंता तूं जर सोडली नाहीस, तर मात्र तू दोषी होशील.
आता जर तू स्वधर्म विचारीत असशील, तर क्षत्रियाचा क्षात्रधर्म ऐक. त्या क्षात्रधर्माप्रमाणे समरांगणात पित्यापुत्रानी एकमेकांना वधिले असता क्षत्रियांना दोष नाही. युद्ध म्हणजे क्षात्रधर्माचे एक तीर्थच आहे. समरांगणात मृत्यु पावतो तो नित्यमुक्तच होतो. हे जे तुला तुझ्या भाग्याने प्राप्त झाले ते अनिष्ट असे तू मानतोस ! जो निखालस निरभिमानी असतो, तोच समरांगणामध्ये खरा शूर होय. अर्जुना ! तू अभिमान सोडलास तर माझ्याच बरोबरीला पोचशील आणि मग कोणत्याही पातकाची वार्तासुद्धा तुला मुळीच स्पर्श करणार नाही. आता ती अहंता जाईल कशी ? तेही सविस्तर सांगतो.
क्रमशः







