हुबळीच्या सीसीबी पोलिसांची कारवाई
वार्ताहर / हुबळी
कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणाऱया रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करण्यात येत असल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांना देण्यात येणाऱया ऍम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचाही काळाबाजार होत आहे. या प्रकरणी शुक्रवारी हुबळीच्या सीसीबी पोलिसांनी एका खासगी इस्पितळाच्या पीआरओसह तिघांना अटक केली आहे.
नासीर हुसेन अत्तार, राघवेंद्र उणकल आणि नागराज नडवलकेरी अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ऍम्फोटेरिसिन-बीचे 4 वायल्स जप्त करण्यात आले आहेत. हुबळीतील एका खासगी इस्पितळात रुग्णाच्या चिकित्सेसाठी फार्मसीने ऍम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचे वायल्स दिले होते. मात्र, त्या रुग्णाचा उपचाराचा उपयोग न झाल्याने मृत्यू झाला होता. मात्र, यावेळी नासीर हुसेन अत्तार याच्याकडून 7 हजार रुपये किमतीचे इंजेक्शन खरेदी करून राघवेंद्र उणकल आणि नागराज नडवलकेरी हे दोघे अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना 20 हजार रुपयांना विक्री करत होते.
याविषयी माहिती मिळताच सीसीबीचे पोलीस निरीक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली. याप्रकरणी हुबळीच्या विद्यानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तातडीची आवश्यकता असल्याने जप्त केलेल्या ऍम्फोटेरिसिन-बी वायल्सचे हुबळीच्या किम्स इस्पितळाकडे हस्तांतर करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे.









