ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र, पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक फंगस’ या आजाराने अनेक राज्यात अक्षरशः थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. हरियाणामध्ये देखील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे हरियाणा सरकारने ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी लागणाऱ्या ‘एंफोटेरिसन – बी’ च्या 15 हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. हरियाणा सरकारने ही ऑर्डर सिरम कंपनीला दिली असून ऑर्डर तत्काळ पुरवण्यात यावी असे देखील सांगितले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री अनिल विज यांनी शनिवारी दिली.
याबाबत माहिती देताना विज म्हणाले, आम्हाला लवकरच इंजेक्शन मिळतील. 27 मे रोजी आम्ही ग्लोबल टेंडर जारी केले होते मात्र, यामध्ये केवळ एकाच कंपनीने सहभाग घेतला होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेत आम्ही या कंपनीला ऑर्डर दिली आहे. त्यामूळे आम्हाला आता लवकरच इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, प्रदेशात ब्लॅक फंगस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संख्येने 1 हजारचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात प्रदेशात 74 नवीन रुग्ण आढळून आले तर 6 जणांचा मृत्यू झाला. सद्य स्थितीत प्रदेशात 1,025 रूग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. त्यातील 138 जणांची प्रकृती सुधारली असून 784 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.