प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनामुळे रुग्णांचे मृत्यूसत्र चालू असतानाच ‘ब्लॅक फंगस’मुळे (काळी बुरशी, म्युकर मायकोसीस) चार बळी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात सदर आजाराचे 12 रुग्ण असल्याची माहिती दिली होती. परंतु राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने 10 रुग्णच असल्याचा दावा केला होता, तथापि आता 8 रुग्ण उपचार घेत असल्याने आणि 4 मृत झाल्याने 12 रुग्ण होते, हे सत्य उघड झाले असून राज्य सरकारचा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ‘ब्लॅक फंगस’ च्या 12 रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील 2 रुग्णांचा मृत्यू आधीच झाला होता. आता दोन जणांचा मृत्यू झाल्याने त्या आजाराचे एकूण 4 बळी ठरले आहेत. ‘ब्लॅक फंगस’चे बळी वाढल्याने पुन्हा एकदा चिंता सतावत असून इतर 8 जणांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा आरोग्य खाते सूत्रांनी केला आहे. दरम्यान ते बळी त्या आजाराने झाले नसून कोरोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना कोरोनाशिवाय इतर आजार होते, म्हणून त्यांना मृत्यू आल्याचा दावा आरोग्य खात्यातर्फे करण्यात येत आहे.
सध्या तरी गोव्यात या आजाराचे 12 रुग्ण सापडले असून 4 जणांचा अंत झाल्यावर शिल्लक राहिलेल्या 8 जणांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांचे प्राण वाचवावेत म्हणून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान ‘ब्लॅक फंगस’ आजारावरील औषधे गोमेकॉत व इतरत्र मिळत नाहीत. त्यामुळेच त्या आजाराच्या रुग्णांचे बळी गेल्याची भावना नातेवाईकांमध्ये झाली असून तसे ते स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘एम्पोटेरीसीन-बी’ हे औषध त्यासाठी प्रभावित केले आहे. ते गोव्यासाठी पाठवले आहे, परंतु ते उपलब्ध नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.









