कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याविऊद्ध कर्मचाऱ्यांना धमकावल्याची रितसर तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रार नोंद झाल्यानेच डॉमिनिक राब यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण पदाचा राजीनामा देत असून आपला सरकारला पाठिंबा कायम राहील, असे त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे. सध्या तरी तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मी राजीनामा दिल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
डॉमिनिक राब यांच्याविऊद्ध कथित धमकीच्या दोन तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान सुनक यांनी त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे राब यांच्यावर बडतर्फीची टांगती तलवार आधीच होती. अशा परिस्थितीत 4 मे रोजी होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फटका सहन करावा लागण्याचीही भीती आहे.









